युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !
रामराज्य स्थापनेसाठी जळगाव जिल्ह्यात 40 हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न !

“आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित झाला आहे ! मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत, वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत ! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले.
आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणाऱ्या भीषण आपत्काळात मारुतीरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यासह देशभरात ८५० ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. पंचमुखी हनुमान मंदिर, श्री अन्नदाता हनुमान मंदिर, दाणाबाजार या ठिकाणी भाजप प्रदेश राज्य सचिव सौं भैरवी पलांडे, दानाबाजार व्यापारी असोसिएशन चे अशोकजी धूत, नगरसेवक विजय बांदल, राजेंद्र पांडे, दिनेश तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे निखिल कदम,भाजप युवा मोर्चाचे हर्षल सिखवाल यावेळी उपस्थित होते. असोदा येथील जागृत देवस्थान समिती, श्रीराम पेठ येथील हनुमान मंदिर, श्रीधर नगरातील जागृती हौसिंग सोसायटी, सुप्रीम कॉलनी, चौगुले प्लॉट, छत्रपती शिवाजी महाराज नगर, अयोध्या नगर, भोईटे नगर, खोटे नगर, एम आय डी सी, अष्टविनायक माता मंदिर, पिंप्राळा या ठिकाणी गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.

गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला. यावेळी या विविध संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी झाले होते.




