देशलोकल न्यूज़
Trending

अपयशाच्या सहा लढायांनंतर विजयाची सलामी; धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी भरारी

प्रतिनिधी : धरणगाव

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथील सुपुत्र लेफ्टनंट वरुण महेश पाटील यांनी सलग सहा वेळा अपयशाचा सामना करूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या यशामुळे धुळे जिल्ह्यासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वरुण पाटील यांचे वडील महेश शामराव पाटील हे जळगाव येथील एसटी वर्कशॉपमध्ये कार्यरत असून आई विद्या महेश पाटील या गृहिणी आहेत. लहानपणापासूनच शिक्षणासाठी ते काका सुभाष शामराव पाटील व काकू डॉ. वैशाली सुभाष पाटील यांच्याकडे राहिले. काका पाटबंधारे विभागात वर्ग-२ अधिकारी तर काकू शिक्षिका असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे वरुण यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळाली.

पी. जी. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एसपीआय, संभाजीनगर येथे बारावीचे शिक्षण घेतले. पुढे के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.

भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. सहा वेळा SSB मुलाखतीत अपयश आले, तरीही त्यांनी हार मानली नाही. स्वतःतील उणिवांवर मात करत अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासावर सातत्याने भर दिला.

त्यांच्या या जिद्दीचे फळ म्हणून त्यांना SSC Tech-64, TGC-141 आणि Indian Navy Pilot या तीन ठिकाणी SSB Recommendation मिळाली. त्यानंतर OTA गया येथे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून IMA देहरादून येथे Permanent Commission साठी प्रशिक्षण घेत त्यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून यशस्वी प्रवेश केला.

वरुण यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, काका-काकूंचे मार्गदर्शन तसेच भाऊ निशांत, साहिल, प्रतीक आणि बहीण अलिशा यांचा मोलाचा पाठिंबा लाभला.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सारवे गावच्या सुपुत्राने मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला असून त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून तरुणांना “अपयश हा शेवट नसून यशाची सुरुवात असते” हा मोलाचा संदेश मिळत आहे.

लेफ्टनंट वरुण महेश पाटील यांना उज्ज्वल सैनिकी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!