तालुका प्रतिनिधी : ब्रह्मपुरी
परिसरात सुमारे ऐंशी वर्षांवरील एक वृद्ध महिला दिवसभर एकटीच भटकताना आढळल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते श्री भागवत सर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पुढाकार घेत त्या महिलेची विचारपूस केली.
मात्र, संबंधित महिलेला स्वतःचे नाव, पत्ता किंवा घराबाबत स्पष्ट माहिती देता येत नव्हती. त्यांच्या बोलण्यावरून त्या गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे जाणवत होते. त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने, हातात दोन पिशव्या आणि चालण्यासाठी काठी होती.
दिवसभर भटकल्यामुळे त्या भुकेल्या व तहानलेल्या असाव्यात, असा विचार करून भागवत सर यांनी त्यांना जवळच्या ठिकाणी बसवून बिस्किटे व पिण्याचे पाणी दिले. दरम्यान, रात्र होऊ लागल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा वावर, अंगावरील दागिने, तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
फोन केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित महिलेची चौकशी करून तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी घेऊन गेले.
वेळीच दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे एका असहाय्य वृद्ध महिलेला सुरक्षित आधार मिळाला. श्री भागवत सर यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्याचा हा आदर्श समाजासमोर ठेवणारा आहे.