धरणगाव तालुक्यात अवैध ‘कोथरी-पोटली’ दारूची सर्रास विक्री; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष, नागरिकांचा जनआंदोलनाचा इशारा
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेकडे धरणगावकरांचे लक्ष.

धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध ‘कोथरी-पोटली’ गावठी दारूची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अवैध दारू विक्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या उघड माथी सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग काय कारवाई करणार? याकडे सर्व धरणगावकर आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्याती काही ठराविक भागात छुप्या आणि काही ठिकाणी उघडपणे या घातक दारूची विक्री केली जात आहे. तरुण पिढी आणि अनेक कुटुंबे या अवैध दारूच्या विळख्यात अडकत चालली असून, यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सोशल मीडियावर दारू विक्रीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या बेकायदेशीर धंद्यांना कोणाचे अभय आहे, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांमध्ये तीव्र संताप; आंदोलनाचा पवित्रा
अवैध दारू विक्रीमुळे महिला वर्ग आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाने तात्काळ आणि कठोर पावले उचलून हे अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जर प्रशासनाने तात्काळ ही अवैध दारू विक्री थांबवली नाही, तर संपूर्ण धरणगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाचे ‘जनआंदोलन’ उभारण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
आता या गंभीर प्रकारावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करते, की नेहमीप्रमाणे याकडे डोळेझाक केली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.




