एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना 80 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीकडून अटक

एरंडोल (जळगाव): जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मोबदल्यात 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील सरपंचासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी जळगावात रंगेहात पकडले.
तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी रिंगणगाव ग्रामपंचायतीत जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 50 लाख 23 हजार 321 रुपयांचे काम पूर्ण केले होते. यातील 1 कोटी 27 लाख 23 हजार 321 रुपयांचे बिल मिळाले असले तरी उर्वरित 23 लाख रुपये प्रलंबित होते. कामाचे ताबे देण्यासाठी आवश्यक असलेला हस्तांतर करारनामा सरपंचांकडून प्रलंबित असल्याने देयक थांबले होते.
6 ऑक्टोबर रोजी सरपंच भानुदास पुंडलिक मते आणि सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हस्तांतरनामा देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. अखेर 80 हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.
एसीबीने मंगळवारी सायंकाळी जळगावातील काव्य रत्नांजली चौकात सापळा रचला. खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील याच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सरपंच भानुदास मते, सदस्यपती समाधान महाजन आणि पंटर संतोष पाटील यांना बेड्या ठोकल्या.
या कारवाईमुळे रिंगणगाव ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे.
अटक आरोपींची नावे:
- भानुदास पुंडलिक मते (सरपंच, रिंगणगाव, ता. एरंडोल)
- समाधान काशीनाथ महाजन (सदस्यपती, एरंडोल)
- संतोष नथ्थू पाटील (पंटर, ता. धरणगाव)
सापळा यशस्वी करणारे अधिकारी:
जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, ग्रेडेडे पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे व कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई यशस्वी केली.



