कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘महिला सप्ताह’ निमित्त मैदानी स्पर्धांचे उत्साहात आयोजन.

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभागाच्या वतीने ‘महिला सप्ताह’ निमित्त विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विविध मैदानी व इनडोअर क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ६ मार्च रोजी पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

याप्रसंगी क्रीडा विभागाचे प्रा. अमर हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे काळाची गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच त्यांनी सहभागी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- क्रिकेट स्पर्धेत ‘सानिया तडवी’ आणि ‘सोहम पाटील’ यांच्या संघांची बाजी
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या क्रिकेट स्पर्धेने झाली. यात प्रतिभा वळवी यांचा संघ विरुद्ध सानिया तडवी यांचा संघ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सानिया तडवी यांच्या संघाने विजय मिळवत बाजी मारली.
त्यानंतर मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगला. सोहम पाटील विरुद्ध जगन्नाथ ठाकूर यांच्या संघात झालेल्या या सामन्यात सोहम पाटील यांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अवघ्या दोन धावा राखून विजय संपादन केला.
- बॅडमिंटनमध्ये धनश्री आणि सागर चमकले
मैदानी स्पर्धांनंतर विद्यापीठाच्या इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत धनश्री शिरसाठ आणि सागर जाधव यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
- नियोजन आणि परिश्रम
या संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे समन्वयक म्हणून प्रा. विनेश पावरा यांनी चोख जबाबदारी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. वर्षा पालखे आणि प्रा. योगेश माळी यांनी विशेष मेहनत घेतली. समाजकार्य विभागाच्या या उपक्रमाचे विद्यापीठ परिसरात कौतुक होत आहे.



