जळगावमध्ये हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणींचे आयोजन.
‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ कार्यक्रमातून स्वसंरक्षण आणि स्वावलंबनाचा प्रेरणादायी संदेश !

जळगाव : हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ हा प्रेरणादायी कार्यक्रम जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला शहरातील मोठ्या संख्येने महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.


मेजर मैत्रेयी दांडेकर आणि आयर्नमॅन माहेश्वरी सरनोबत यांचे अमूल्य मार्गदर्शन सर्वांना लाभले. यासोबतच महिलांसाठी स्वरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिके हिंदू जनजागृती समितीच्या सादर करण्यात आली, ज्याला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मेजर मैत्रेयी दांडेकर यांचा सत्कार डॉ. रेखा महाजन यांनी तर माहेश्वरी सरनोबत यांचा सत्कार सौ. शैलाताई चौधरी यांनी केला.

स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक महिलेसाठी अत्यावश्यक ! – मेजर दांडेकर
आपल्या मार्गदर्शनात मेजर मैत्रेयी दांडेकर यांनी सांगितले की, ‘महिलांनी संकटसमयी धैर्य, आत्मविश्वास आणि तत्परता ठेवणे आवश्यक आहे. सध्याचा प्रतिकूल काळ आणि घडणाऱ्या घटना पाहता आपले रक्षण इतरांनी करावे अशी अपेक्षा न ठेवता स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक महिलेने / युवतीने घेणे अत्यावश्यक आहे.’
जिद्द, निश्चय यासोबत ईश्वरावरील श्रद्धाही आवश्यक ! आयर्नमॅन माहेश्वरी सरनोबत
माहेश्वरी सरनोबत म्हणाल्या, ‘‘अत्यंत कठीण असलेली ‘आयर्नमॅन’ या स्पर्धेत ४ किलोमीटर समुद्रात पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ७२ किलोमीटर धावणे असे अत्यंत कठीण प्रकार एकाच वेळी पार करायचे असतात. अत्यंत कठीण आणि प्रतिकूल वातावरणात होणारी ही स्पर्धा मी केवळ नामस्मरण आणि साधनेच्या जोरावर पार पाडू शकले. ही स्पर्धा पार करण्यासाठी १७ घंट्यांचा कालावधी असतो, तर ही स्पर्धा मी गुरुकृपेच्या बळावर १५ घंट्यात पूर्ण करू शकले. त्यामुळे युवती त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या कृती करतील त्या त्या कृती या प्रत्येक वेळी ईश्वराला स्मरण करून अनुसंधान ठेवूनच कराव्यात. असे केल्यास त्यांना यश निश्चित मिळेल !’’

जळगाव येथील रणरागिणींचा विशेष सत्कार !
वयावर मात करून जिद्दीच्या बळावर सायकलिंग मध्ये भरीव यश मिळवणाऱ्या (आतापर्यंत जवळपास 50,000 किमी सायकलिंग केले आहे) जळगाव येथील रणरागिणी कामिनी धांडे यांचा मान्यवर वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यासोबत 150 मिनिटात 500 सूर्यनमस्कार, 100 योगासने आणि 75 योग मुद्रा करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड करणाऱ्या जळगाव येथील रणरागिणी हेतल पिपरिया यांचाही मान्यवर वक्त्यांच्या हस्ते या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नीतू परदेशी, भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष नीला चौधरी, जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, भाजप नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या रेखा वर्मा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात आदिशक्ती श्री दुर्गादेवी आणि जळगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना व श्लोक म्हणत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश गायत्री बारी यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले विशेष फलक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला.



