
साळवे प्रतिनिधी :
साळवे तालुका धरणगाव येथील इंग्रजी विद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालय परिसर भगव्या पताका, फलक व घोषवाक्यांनी सजविण्यात आला होता. सकाळी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व आरती गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मुख्याध्यापक एस. डी. मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नेतृत्व, शौर्य, संघटनकौशल्य आणि स्वराज्य स्थापनेतील योगदान विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना महाराजांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणे सादर केली. भाषणांमधून महाराजांचे बालपण, जिजाऊंचे संस्कार, तोरणा जिंकण्याची घटना, अफझलखान वध आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास प्रभावीपणे मांडण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व जोशपूर्ण पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले.
इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित उत्कृष्ट सभिनय नाट्यछटा सादर केली. या नाट्यछटेत महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्त्रीसन्मानाची भूमिका आणि स्वराज्याची प्रेरणा जिवंतपणे उभी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अभिनयाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बी. आर. बोरोले यांनी प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन रंजना नेहेते व प्रतिभा पाटील यांनी केले.
यावेळी शिक्षक जी. व्ही. नारखेडे, एस. व्ही. राठोड, व्ही. के. मोरे, शिक्षिका गुणवंती पाटील, वर्षा नेहेते, पौर्णिमा वारके तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात देशप्रेम, शौर्य आणि आदर्श नेतृत्वाचे संस्कार जोपासण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ झाली.




