सोलापूर – वारकरी संप्रदाय गेली अनेक शतके समाजाला नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्तीची शिकवण देत आहे. आजही हा संप्रदाय धर्म आणि राष्ट्रहितासाठी अविरत कार्यरत आहे. याच भूमिकेतून वारकरी ऐक्य साधण्यासाठी आणि शासनाकडे महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरण्यासाठी आषाढी एकादशीच्या (२५ जुलै) पावन पर्वावर पंढरपूर येथे एक दिवसीय भव्य ‘वारकरी महाअधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. पंढरपूर, आळंदी येथे वर्ष २००८ पासून अशा प्रकारची अधिवेशन चालू असून या महाअधिवेशनात हिंदुत्वासाठी कार्य करणार्या ह.भ.प. आणि पूजनीय संतांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणार्या तथाकथित पुरोगाम्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल. तसेच, धर्मरक्षणासाठी झटणार्या हिंदुत्वनिष्ठ संतांचा या वेळी जाहीर सन्मान करण्यात येणार आहे, *असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले.*
या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज तुनतुने (शास्त्री), राष्ट्रीय प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.
हे महाअधिवेशन दिनांक २५ जुलै २०२६ (आषाढी एकादशी) दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत पंढरपूर येथील भक्तीमार्ग, जनकल्याण हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठात पार पडेल. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आचार्य पूज्यपाद श्री १००८ दंडी स्वामी अमृताश्रम महाराज भूषवणार असून, सरला बेट, श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांचे मार्गदर्शन या अधिवेशनाला लाभणार आहे.
या अधिवेशनात ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वरशास्त्री महाराज आणि सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे (पंढरपूर) विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी) चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज मार्गदर्शन करतील. तसेच, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षय महाराज भोसले, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशप्रमुख श्री. तुषार भोसले, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुती महाराज तुनतुने, ह.भ.प. बापू महाराज रावकर, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांसह अनेक मान्यवर संत, महंत, धर्माचार्य आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुखही आपले विचार मांडणार आहेत.
या अधिवेशनात वारकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांसमुक्त करावीत तसेच या तीर्थक्षेत्रांच्या 10 किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर सक्त बंदी आणावी, ही प्रमुख मागणी असेल. याशिवाय, संत-वाङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म आणि देवतांचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ’ईशनिंदा प्रतिबंधक कायदा’ लागू करावा आणि संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा. नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’सारख्या संघटनांना तसेच नास्तिक अन् पुरोगाम्यांना वारीत येण्यास प्रतिबंध करावा आणि ‘अंनिस’च्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी तात्काळ प्रशासक नेमावा. वारकरी शिक्षण संस्था आणि वेद पाठशाळांना मासिक अनुदान द्यावे, चंद्रभागा व इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण त्वरित रोखावे आणि ‘वक्फ बोर्डा’ने हडपलेल्या मंदिरांच्या जमिनी परत मिळवण्यासाठी शासनाने त्वरित निर्देश द्यावेत, अशा महत्त्वपूर्ण मागण्या या वेळी शासनाकडे केल्या जातील.
तसेच, पुरातत्त्व विभागाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या धर्मविरोधी निर्णयाविरुद्ध वारकरी अन् मंदिर महासंघ यांनी दिलेल्या लढ्याबाबत या महाअधिवेशनात चर्चा केली जाईल. प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ कायमस्वरूपी रद्द करून देवभूमीचे रक्षण करणारा ‘अँटी लँड ग्रॅबिंग अॅक्ट’ लागू झाला पाहिजे, असा महत्त्वाचा ठरावही मांडण्यात येईल. समस्त वारकरी आणि भाविकांनी या ऐतिहासिक अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी श्री. विनोद रसाळ (संपर्क: ९९७५५९२८९२) यांच्याशी संपर्क साधावा.
Back to top button
error: Content is protected !!