शेंदुर्णीतील त्रिविक्रम मंदिरातील नंदी मूर्तीची विटंबना.
हिंदू समाजाकडून शेंदुर्णी बंदाची हाक


जामनेर प्रतिनिधी | शेंदुर्णी, ता. जामनेर | दिनांक : 21 नोव्हेंबर 2025
शेंदुर्णी गावाच्या ग्रामदैवत असलेल्या भगवान श्री त्रिविक्रम महाराज मंदिरातील नव्यानेच स्थापित नंदीच्या मूर्तीची अज्ञात व्यक्तीकडून विटंबना झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. संध्याकाळी ही बाब काही भाविकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर संतप्त भाविकांसह सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमा झाला आणि या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम, पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, तसेच शेंदुर्णी दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे आणि पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, “आरोपीला लवकरच अटक केली जाईल,” असे आश्वासन उपस्थितांना दिले.
या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते. मूर्तीची झालेली विटंबना ही अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
या घटनेचा निषेध म्हणून शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण शेंदुर्णी शहर बंद ठेवण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे. आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सर्वांनी मागणी केली आहे.
घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.




