क्राइममहाराष्ट्र
Trending

पत्रकारांना धमकी देणाऱ्या वक्तव्याचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाकडून तीव्र निषेध

▪️लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान सहन केला जाणार नाही - राजेंद्र वाघ 

धरणगाव : लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, समस्या आणि वास्तव परिस्थिती समाजासमोर मांडण्याचे कार्य सातत्याने करीत असतात. मात्र, पत्रकारांशी संवाद साधताना लोकप्रतिनिधींकडून आक्षेपार्ह भाषा वापरली जाणे ही बाब लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असल्याचे मत पत्रकार जितेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

      ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कथितरित्या अरेरावीची भाषा वापरून पत्रकारांना धमकी दिल्याच्या घटनेचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबई येथे काही पत्रकार बातमी व मुलाखतीसाठी गेले असता, यावेळी संबंधित पत्रकारांशी अपमानास्पद भाषेत संवाद साधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकारांना उद्देशून शिवीगाळ करणे तसेच “माझ्या नादाला लागला तर एकतर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल”, “पुन्हा समोर आल्यास मारून पाठवणार” अशा प्रकारची धमकीची भाषा वापरणे ही घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह असल्याचे पत्रकार संघाने म्हटले आहे. लोकप्रतिनिधींकडून समाजाला संयम, कायद्याचा आदर आणि लोकशाही परंपरांचे पालन करण्याची अपेक्षा असते. मात्र, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यामुळे त्यांना धमकावणे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे आणि दहशत निर्माण करणारी भाषा वापरणे हा केवळ पत्रकारांचा अपमान नसून लोकशाही प्रक्रियेवर आघात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारच्या घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे पत्रकार संघाने नमूद केले. कोणतीही व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी कायद्यापेक्षा मोठी नाही. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे वातावरण मिळणे ही लोकशाहीची गरज आहे, असे मत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी धरणगाव अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद रोकडे, ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. व्ही. एस. भोलाणे, जितेंद्र महाजन, निलेश पवार, पी. डी. पाटील, ॲड. हर्षल चौहान, विकास पाटील, रविंद्र कंखरे, सुधाकर मोरे, राजू बाविस्कर, सतीश शिंदे, ॲड.स्वप्नील भाटिया, सतीश बोरसे, किरण चव्हाण, मनोज महाजन, व्ही. जी. पाटील, विनोद मोरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!