धर्म
Trending

आता रडायचं नाही… लढायचं!” – विखरण येथे शौर्य प्रशिक्षण शिबिरात ४५ हून अधिक युवती सहभागी.

ता. एरंडोल, विखरण : युवतींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी आणि संकटसमयी स्वतःचा बचाव करण्याचे कौशल्य आत्मसात करता यावे, या उद्देशाने विखरण येथे शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आयोजित या शिबिराला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४५ हून अधिक युवतींनी सहभाग घेतला.

या प्रशिक्षण शिबिरात महिला प्रशिक्षक धनश्री दहिवदकर यांनी युवतींना लाठी-काठी, कराटे तसेच विविध स्वसंरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण दिले. मुलींची छेड काढल्यास किंवा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास भीती न बाळगता स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा एखाद्याने हात पकडल्यास त्यातून कसे सुटावे यासारख्या अनेक सोप्या व प्रभावी ट्रिक्स प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यात आल्या.

यावेळी समितीचे श्री. निखिल कदम यांनी उपस्थित युवतींना मार्गदर्शन करताना स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “तुमचा भाऊ अथवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती तुमचे चोवीस तास रक्षण करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक युवतीने स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, ज्या राक्षसांचा वध देवतांनाही करता आला नाही, त्या राक्षसांचा संहार करण्यासाठी दुर्गामातेला अवतार घ्यावा लागला. यावरून हिंदू महिला सुद्धा पुरुषांप्रमाणेच सामर्थ्यवान आहेत. दुर्गामातेच्या आठही हातांतील शस्त्रे आपल्याला स्वसंरक्षणाची प्रेरणा देतात.

या कार्यक्रमासाठी विखरण गावातील युवती व गावकऱ्यांनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे आयोजन केले असून पुढील काळात युवतींसाठी साप्ताहिक प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!