धर्ममहाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्तिभावात संपन्न.

महामंडलेश्वर अनंत दासजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनातून श्रीकृष्ण चरित्राचा जागर.

धरणगाव | प्रतिनिधी

धरणगाव येथील हनुमान नगर परिसरात माऊली वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने स्व. सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित त्रितप पूर्ती सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दि. २६ जानेवारी २०२६ ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत व ख्यातनाम कीर्तनकारांनी उपस्थिती लावून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ दिला. शब्दप्रभू ह.भ.प. श्री अशोकजी महाराज सत्रे (वैजापूर), ह.भ.प. श्री विश्वनाथजी महाराज कोल्हे (नाशिककर), युवाचार्य ह.भ.प. श्री संतोषजी महाराज आढावणे (भोकरदन), रामायणाचार्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वरजी महाराज (आळंदीकर), आंतरराष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री विनोदजी कृष्णशास्त्री महाराज (संभाजीनगर) तसेच वारकरीरत्न ह.भ.प. श्री उद्धवजी महाराज चोले (खडकीकर) यांची प्रभावी व रसाळ कीर्तने झाली.

सप्ताहाच्या समारोपप्रसंगी श्री १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. श्री महंत अनंतदासजी महाराज कजवाडेकर (नाशिक) यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. या कीर्तनातून त्यांनी श्रीकृष्ण जन्मकथेचे, बाललीलांचे, माखनचोरी, गोपाळांचा आनंद, दहीहंडी उत्सव व भक्त-भगवंतातील अतूट नात्याचे अत्यंत भावस्पर्शी वर्णन केले. गोकुळ-वृंदावनातील भक्तिरस, सामूहिक काला व दहीहंडीमधून व्यक्त होणारी एकता, आनंद व धर्मभावना त्यांनी प्रभावी शब्दांत मांडली.

या धार्मिक व सामाजिक सोहळ्यास पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील, कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन, उद्योजक सुरेश सिताराम चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी, निलेश सुरेश चौधरी, प्रतापरावजी पाटील, शिवसेना उपनेते गुलाबरावजी वाघ यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

महंत ह.भ.प. श्री १००८ महामंडलेश्वर भगवानदाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा उपक्रम ३६ व्या वर्षी यशस्वीरीत्या संपन्न झाला. यानिमित्त पुरणपोळी, खीर, रस्सी, भात-भजी असा स्वादिष्ट महाप्रसाद आयोजित करण्यात आला असून सुमारे १५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सप्ताहात दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ व कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. श्री आर. डी. महाजन, ह.भ.प. एकनाथ महाराज, नरेंद्र पाटील, अमोल महाजन, सुनील चौधरी, राहूल महाराज, जितू महाराज व हनुमान नगर मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजन माऊली वारकरी शिक्षण संस्था विश्वस्त व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!