क्राइमलोकल न्यूज़

चोपड्यात वाळू तस्करांचा धक्कादायक प्रकार: तलाठ्याला ट्रॅक्टरखाली मारण्याचा प्रयत्न

चोपडा (प्रतिनिधी): चोपडा तालुक्यातील बुधगाव ते जळोद रस्त्यावर तापी नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करताना वाळू तस्करांनी ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) सकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई

अमळनेर प्रांत अधिकाऱ्यांना तापी नदीपात्रात बुधगाव ते जळोद दरम्यान अवैध वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, सुधाकर महाजन, तिलेश पवार आणि भूषण पवार यांचे पथक रविवारी पहाटे ४ वाजता कारवाईसाठी रवाना झाले. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पथकाला नदीपात्रात वाळू भरलेले ट्रॅक्टर दिसले. चौकशीदरम्यान चालकाने ट्रॅक्टर अजय कोळी यांचे असल्याचे सांगितले आणि पथकाला पाहून पळ काढला.

ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न

ट्रॅक्टर जप्त करून चोपडा तहसील कार्यालयात नेत असताना अनंत माळी ट्रॅक्टरवर बसले होते. यावेळी चालक विजय पावरा आणि मालक अजय कैलास कोळी (दोघेही रा. बुधगाव) यांनी रस्त्यात अडथळा निर्माण करत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. विजय पावरा याने अनंत माळी यांची कॉलर पकडून खाली ओढले आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना ट्रॅक्टरच्या मागील चाकासमोर फेकले. प्रसंगावधान राखत मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी तात्काळ माळी यांना बाजूला ओढल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र त्यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली.

आरोपींचा पलायन, गुन्हा दाखल

हल्ल्यानंतर विजय पावरा आणि अजय कोळी यांनी ट्रॅक्टरमधील वाळू खाली ओतून ट्रॅक्टरसह पळ काढला. जखमी अनंत माळी यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली असून, वाळू तस्करीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!