सोलापूर शहरातील बापूजीनगर येथील शासकीय समाजमंदिराचा बेकायदेशीरपणे ‘चर्च’ म्हणून वापर करणे, परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि हिंदू आरक्षणाचा गैरवापर करून शासकीय नोकरी लाटणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक दत्तात्रय कानेपागूल उर्फ येहान मार्क कानेपागूल याच्या कथित गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत. या संदर्भात आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त श्रीमती सोनाली यादव यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
या प्रकरणाबाबत हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदु जनजागृती समिती पाठपुरावा केला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन घेत सोलापूरचे माजी मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री मा. श्री. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिका आयुक्त आणि राज्यमंत्री या दोघांनीही एकाच वेळी चौकशीचे चक्र फिरवल्यामुळे आता या प्रकरणाची सर्व अंगाने चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासकीय वास्तूवर थेट अतिक्रमण सोलापूर महानगरपालिकेने हे समाजमंदिर केवळ सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले होते. या कराराची मुदत संपलेली आहे. तसेच मूळ कराराच्या अनेक अटी धाब्यावर बसवून या सार्वजनिक वास्तूला बेकायदेशीरपणे ‘चर्च’चे स्वरूप देणे हे थेट ‘कायदेशीर अतिक्रमण’ ठरते. परिसरातील लोकांना ध्वनिक्षेपक मोठ्या आवाजामुळे त्रास देणे, गरीब हिंदूंचे धर्मांतर करणे, धार्मिक भावना दुखवणारी वक्तव्य करणे आदी अनेक गैरकृत्य तेथे होत असल्याच्या तक्रारी आहेत.
मनपा सेवक कानेपागूल याने ‘हिंदू मोची’ समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवली. मात्र सद्यस्थितीत तो ख्रिश्चन धर्म स्वीकारून ‘जिजस गॉस्पेल सोसायटी’चा मुख्य पास्टर म्हणून काम पाहत आहे. शासकीय सेवेत राहून दुहेरी लाभ घेणे हा शासनाची फसवणूक करणारा गंभीर गुन्हा आहे.
राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला मज्जाव या सार्वजनिक समाजमंदिरात स्थानिक नागरिकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जांबमुनी महाराज यांची जयंती साजरी करण्यास मज्जाव केला जातो. तसेच, ध्वनिक्षेपक लावून हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करून समाजात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या प्रमुख मागण्या:
‘जिजस गॉस्पल सोसायटी’चा महानगरपालिकेसोबतचा भाडेकरार रद्द करून ती वास्तू त्वरित सील करावी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी खुली करावी, अशी प्रमुख मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९’ चा भंग केल्याप्रकरणी मनपा सेवक कानेपागूल याला सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. यासोबतच, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
“प्रशासनाने आणि विधी व न्याय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांचे आम्ही स्वागत करतो. आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पुढील १५ दिवसांत संबंधित अनधिकृत चर्चची वास्तू सील करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिला आहे.