अंमळनेर (प्रतिनिधी) : देशातील क्रमांक एकची व तब्बल 52 देशांमध्ये कार्यरत असलेली व्हाईस ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना आयोजित राज्यस्तरीय दोन दिवसीय केडर कॅम्प 2025 अंमळनेर येथील मंगल ग्रह देवस्थान येथे आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला.
या कॅम्पच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलनानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी शैक्षणिक व आरोग्य या क्षेत्रात संघटना नेहमीच अग्रेसर आहे. लातूर जिल्हा अध्यक्ष संगम कोतवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत 350 हून अधिक पत्रकारांच्या विमा पॉलिसी काढण्यात आल्या असून, लातूरमध्ये 100 घरांच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
शेतकरी नेते रवींद्र कोतकर यांनी आपल्या भाषणात पत्रकारितेला तपश्चर्या मानत “चांगल्या माणसांना जपा” असे आवाहन केले. तर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या मनोगतात, “पत्रकारांमुळेच मला राजकारणात स्थान मिळाले. अंमळनेरमधील पत्रकारांच्या सुख-दुःखात मी सदैव तत्पर राहीन,” असे नमूद केले.
कार्यक्रमाला राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार अरुण भाई गुजराती यांनीही शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले, तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
पहिल्या दिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून उद्या दुसऱ्या दिवसाचा समारोप सोहळा होणार आहे.