गिरणा धरणाचे पाणी नदीत न सोडता थेट पाटात सोडा; उ.बा.ठा शिवसेनेची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.

धरणगाव प्रतिनिधी- रवींद्र निकम
गिरणा धरण १००% भरले असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे पाणी वाया जाऊ न देता, ते शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाटात सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेने केली आहे. या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय कार्यकारी अधिकारी तुषार राजपूत यांना निवेदन दिले.
यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची मोठी आशा आहे. हे पाणी नदीत सोडून वाया घालवण्याऐवजी ते पाटात सोडल्यास रब्बी हंगामासाठी मोठा आधार मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना उपनेते व रावेर-नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण १००% भरले असून, पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे पाणी नदीत न सोडता, दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे थेट अमळनेर तालुक्यातील शेवटच्या चारीपर्यंत सोडण्यात यावे. असे केल्याने शेतकऱ्यांच्या विहिरींना परक्युलेशनद्वारे (पाझरून) पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.”
यावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, युवा सेना शहर प्रमुख लक्ष्मण माळी, युवा सेना उपजिल्हा संघटक हेमंत महाजन, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, तालुका समन्वयक संतोष सोनवणे, लीलाधर पाटील, रणजित सिंग शिखरवार, रमेश चव्हाण, सतीश बोरसे, किरण अग्निहोत्री, जगदीश मराठे, प्रेमराज चौधरी, जीभाऊ पाटील, तसेच प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



