धुळे येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंदिर – न्यास जिल्हा अधिवेशन !
350 हून अधिक मंदिरप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

मंदिरे ही धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनायला हवीत ! – श्री आनंद जीवन स्वामी, स्वामीनारायण मंदिर
- धुळे येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंदिर – न्यास जिल्हा अधिवेशन !
- 350 हून अधिक मंदिरप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !
धुळे – मंदिरे ही आपल्या धर्माची आधारशीला आहेत. तेथून समाजाला ऊर्जा, चैतन्य आणि शांती ची अनुभूती होते. सद्यस्थितीत मंदिरात येणाऱ्या भाविकांना आपली संस्कृती, धार्मिक आचरण या गोष्टींची माहिती देणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी मंदिरे ही धार्मिक अन् सांस्कृतिक केंद्र बनायला हवीत, असे मार्गदर्शन स्वामीनारायण मंदिर धुळे येथील श्री आनंद जीवन स्वामी यांनी केले. ते धुके येथे आयोजित मंदिर अधिवेशनाच्या प्रथम सत्रात बोलत होते.


श्री स्वामीनारायण मंदिर, देवपूर, श्री एकविरा देवी मंदिर, देवपूर, श्री नरसिंह मंदिर, आग्रा रोड, कान्हदेश वारकरी सेवा मंडळ, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन पार पडले. श्री स्वामीनारायण मंदिर, देवपूर, धुळे येथे १७ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, आनंद जीवन स्वामी, प्रा. प्रकाश पाठक, एकविरा देवीचे श्री. सोमनाथ गुरव, माजी सह धर्मदाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, हिंदु जनजागृतीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन श्री. वसंत पाटील यांनी केले. अधिवेशनाचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.
या अधिवेशनाला धुळे आणि चाळीसगाव, जळगाव येथील विविध मंदिरांचे 350 हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधी, पुजारी, वकील उपस्थित होते.
मंदिरांचे रक्षण आणि संघटन करण्यासाठी मंदिर महासंघ कटिबद्ध ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांचे रक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धारही केले. यातून मंदिरांचे महत्त्व लक्षात येते. आज मात्र भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे मंदिरांवर नवीन पद्धतीने आघात होत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांत भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्ही.आय.पी.’ दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे यांसह ‘वक्फ बोर्डा’चे अतिक्रमण चालू आहे. यामुळे मंदिर रक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ कार्यरत आहे. मंदिरांच्या समस्या सोडवतांनाच महासंघ मंदिरांचे संघटन करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.
मंदिरे – धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवी ! – सद्गुरू नंदकुमार जाधव
मंदिर हा हिंदु संस्कृतीचा वारसा आहे, तो जतन करणे महत्त्वाचे आहे. आपला धर्म, संस्कृती जीवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांमुळे झालेले आहे. मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणाऱ्यांना धर्माचा अभ्यास नसतो. तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले तर त्यांची श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल. मंदिरांतून संस्कारवर्ग घेणे, धर्मशास्त्र समजावून सांगणे हे कार्य नियमित व्हायला हवे. हिंदु समाजाची जन्म हिंदु ते कर्म हिंदु पर्यंत वाटचाल होण्यासाठी मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवी, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी केले.
नरेटीव्ह वॉरचा सामना करण्यासाठी वैचारिक सामर्थ्य वाढवणे आवश्यक ! :- प्रा. प्रकाश पाठक, धुळे
मंदिर संस्कृतीला अपकिर्त करण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे षडयंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावरून खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपल्या परंपरा, उत्सव, आस्था यांवर उगाच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, आपल्या क्षुल्लक चुका जाणीवपूर्वक मोठ्या करून हिंदूंना जागतिक स्तरावर बदनाम करणे हे सर्व प्रयत्न आपले खच्चीकरण करण्यासाठी पद्धतशीर सुरू आहेत. याचा सामना करण्यासाठी आपणही धार्मिक अभ्यास करून आपले वैचारिक सामर्थ्य आणि शुद्धता वाढवणे आवश्यक आहे.
या वेळी निवृत्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी न्यास नोंदणी तसेच मंदिरांच्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मंदिर विश्वस्तांना मंदिरांच्या जमिनीविषयी येणाऱ्या अडचणी याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला. समारोपीय सत्रात मंदिर महासंघाच्या कार्याची पुढील दिशा कशी असावी ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आभार प्रदर्शन श्री. पीयूष खंडेलवाल यांनी तर ठरावाचे वाचन श्री. मयूर बागुल यांनी केले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन श्री. चेतन जगताप यांनी केले.
धुळे येथे मंदिर महासंघाच्या कार्यकारिणीची घोषणा !
या वेळी 1 वर्षासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची धुळे जिल्हा कार्यकारिणीची औपचारिक घोषणा करण्यात आली. यात सर्वश्री अक्षय मुंडके, चंदन सोनार, विकास राजपूत, चेतन जगताप, अजय कासोदेकर, प्रमोद सैंदाने, सुनील वाघ, शंकर शर्मा, राजीव कुमार झा महाराज यांचा समावेश असून कायदेशीर यांना मार्गदर्शन अधिवक्ता अमित दुसाने आणि वकील बांधव करणार आहेत. मार्गदर्शक म्हणून आनंद जीवन स्वामी, प्रा. प्रकाश पाठक, सोमनाथ गुरव आणि ह.भ.प. भाऊ महाराज रुद्र यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.



