
पाळधी ता धरणगाव (प्रतिनिधी):
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या नवीन जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी पाळधी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या या निवेदनात माळी यांनी म्हटले आहे की, आर.टी.ई. अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते. मात्र, यावर्षीपासून शाळेपासून घराचे हवाई अंतर ३ किलोमीटर ऐवजी १ किलोमीटर करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेतून बाद होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही अट रद्द करून ती पुन्हा ३ किलोमीटर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाडेकराराच्या अटीचाही उल्लेख
दुय्यम निबंधकाकडून भाडेकरार नोंदणीची सक्तीची अट पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही अट रद्द करून केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घरमालकाच्या संमतीपत्रावर प्रवेश देण्यात यावा. या जाचक अटींमुळे सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने या बाबींचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी कळकळीची विनंती किरण माळी यांनी निवेदनात केली आहे.
या निवेदनामुळे शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतो, याकडे आता सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.





◾ Kiran mali aap bahut accha kaam kar rahe hai par aapko toh TV News par aana chahiye tab ja ke aapke waare me jyada log janege
धन्यवाद साहेब… 🙏