धरणगाव नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. लिलाताई चौधरी यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात.

धरणगाव | प्रतिनिधी- रवींद्र निकम
धरणगाव नगरपरिषद निवडणुकीत विजयी होऊन लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या सौ. लिलाताई चौधरी यांचा पदग्रहण समारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

या पदग्रहण समारंभास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री गुलाबरावजी पाटील, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जळगाव संपर्कप्रमुख मा. श्री संजयजी सावंत, उपनेते मा. गुलाबरावजी वाघ, मा. खासदार श्री उन्मेषदादा पाटील, जळगाव लोकसभा संघटक श्री करणदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच धरणगावचे मा. नगराध्यक्ष श्री सुरेशनाना चौधरी, मा. नगराध्यक्ष श्री निलेशभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. लिलाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
पदग्रहणानंतर सौ. लिलाताई चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानत धरणगावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.




