धरणगावात तीन दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन.
युवतींमध्ये आत्मविश्वास व राष्ट्रभावनेचा जागर

धरणगाव (प्रतिनिधी):
बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिनी शाखेच्या वतीने धरणगाव येथे हिंदू युवतींसाठी निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिनांक 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत बालकवी ठोंबरे विद्यालय, धरणगाव येथे पार पडले.

या तीन दिवसीय शिबिरात युवतींना लाठी-काठी, दंड, साखळी, हात सोडवणे, चाकूचा वार रोखणे अशा विविध आत्मरक्षणाच्या तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. स्वसंरक्षणाची मूलभूत तत्त्वे आणि संकटाच्या प्रसंगी मानसिक तसेच शारीरिक तयारी कशी ठेवावी, याचे सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ प्रशिक्षकांनी दिले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, समितीचे श्री. विनोद शिंदे, बजरंग दलचे श्री. प्रथम राजपूत, तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश फळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते श्री. अनिकेत सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात इतिहासाचे स्मरण करून दिले. ते म्हणाले, “जो देश इतिहास विसरतो तो गुलामगिरीतून बाहेर येऊ शकत नाही. आई जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले तसेच प्रत्येक युवतीने पुढील पिढी घडवण्याची जबाबदारी घ्यावी.”
समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी सांगितले की, “धरणगावमधील या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची निःशुल्क शिबिरे आयोजित करण्यात येतील. सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या सहकार्याने हे अभियान व्यापक स्वरूपात राबवले जाईल.”
प्रमुख वक्ते श्री. प्रशांत जुवेकर यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, “‘वीर भोग्या वसुंधरा’ या श्लोकाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. या पृथ्वीवर राज्य फक्त वीरांचेच असते. दुर्बलांचे रक्षण देवही करत नाही. म्हणून प्रत्येक युवतीने आपली अंतर्गत शक्ती जागृत करून स्वसंरक्षणासाठी सिद्ध होणे हेच खरे वीरत्व आहे.”
शिबिराचे सूत्रसंचालन निकिता महाजन यांनी केले. शेवटी सामूहिक ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
या शिबिरात 240 पेक्षा अधिक हिंदू युवतींनी उत्साहाने सहभाग नोंदवून प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.
कार्यक्रमाचे आयोजन धरणगावातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले.




