क्राइम
Trending

पाळधीत धाडसी चोरी; ४.५ तोळे सोने व दीड लाखांची रोकड लंपास

पाळधी (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४.५ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा नगर परिसरात राहणारे सुरेश तुकाराम पाटील हे मंगळवारी (१० मार्च) सकाळी काही कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

बुधवारी (११ मार्च) सकाळी सुमारे ७ वाजता सुरेश पाटील अमळनेर येथून घरी परतले असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता कपाटातील साडेचार तोळे सोने व सुमारे १ लाख ५० हजार रुपये रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी. स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपास पाळधी पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!