महाराष्ट्रलोकल न्यूज़

चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा महाराष्ट्र जागृत जनमंचतर्फे सत्कार

चोपडा (प्रतिनिधी) — महाराष्ट्र जागृत जनमंचतर्फे राबविण्यात आलेल्या “शेत रस्ता आणि शेत मोजणी अभियान” अंतर्गत उल्लेखनीय सहकार्याबद्दल चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देणे आणि जुन्या वादांचे सामोपचाराने निराकरण करणे हा प्रमुख उद्देश होता. जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी या उपक्रमाला पाठिंबा देत तहसीलदारांना मार्गदर्शन केले होते. तसेच या अभियानाची गती वाढावी म्हणून महाराष्ट्र जागृत जनमंचच्या प्रतिनिधींनी नागपूर येथे जाऊन महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती.

अभियानादरम्यान तहसीलदार थोरात यांनी शेतकऱ्यांच्या अर्जांवर प्रत्यक्ष चर्चा करून वादग्रस्त शेत रस्ता प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली. विशेषतः वढोदा गावातील २१ शेतकऱ्यांना शेत रस्ता उपलब्ध करून देण्यात आला, तर एकूण २० प्रकरणे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली.

या कार्यात जनमंचचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी प्रतिवादी शेतकऱ्यांना समजावून सांगत, कायद्याच्या चौकटीत राहून समझोते घडवून आणले. या संवेदनशील आणि विधायक दृष्टिकोनाबद्दल तहसीलदार थोरात यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता चोपडा तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाऊसाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिवराम पाटील यांनी तहसीलदारांच्या कार्याचा आढावा सादर करत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला राकेश वाघ (जळगाव), संतोष पाटील (अमळनेर), रविंद्र पाटील (खडगाव), दिलीप नेवे (चोपडा), सर्व्हेश साळुंखे (बुधगाव), हिंमतराव पाटील (गरताड), संजय पाटील (वेले) तसेच चोपडा तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र जागृत जनमंच ही निवृत्त सरकारी नोकरांची संघटना असून, शासन आणि जनतेत संवादाचे सेतू निर्माण करण्याचे कार्य ती करते. या उपक्रमामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सौहार्द आणि विश्वासाचे नवे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!