धर्म

स्वा. सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन.

धरणगाव | प्रतिनिधी

स्वा. सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त माऊली वारकरी शिक्षण संस्था, हनुमान नगर, धरणगाव येथे त्रितप पूर्ती सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे अत्यंत भक्तिभावपूर्ण, सात्त्विक व मंगल वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक महोत्सव यंदा ३६ व्या वर्षात पदार्पण करीत असून, सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ पासून सोमवार दिनांक २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भक्तिभावात संपन्न होणार आहे.

या पावन सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काकडा आरती, सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ५ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ तसेच रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत हरिनाम कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी ह.भ.प. श्री भानुदास महाराज औरंगपूरकर, ह.भ.प. श्री आर. डी. महाजन सर, ह.भ.प. श्री मधुकर महाराज पष्टानेकर, ह.भ.प. श्री राहुल महाराज दोनगावकर ह.मु. माऊली वारकरी संस्था, धरणगाव यांचे वाचक म्हणून अमूल्य योगदान लाभणार आहे.

श्रीमद् भागवत कथा श्री कुणाल महाराज (श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव) यांच्या मधुर, रसाळ व भावस्पर्शी कथाकथनातून भाविकांना श्रवणसुख देणार आहेत.

या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित, ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार असून, दररोज रात्री हरिनामाच्या गजरात भक्तीचा महासागर उसळणार आहे.

कार्यक्रमानुसार

▪ सोमवार, २६ जानेवारी – शब्दप्रभू ह.भ.प. श्री अशोकजी महाराज सत्रे (वैजापूर)

▪ मंगळवार, २७ जानेवारी – समाजप्रबोधनकार ह.भ.प. श्री निवृत्तीजी महाराज देशमुख (इंदुरीकर) – सायं. ५ ते ७

▪ बुधवार, २८ जानेवारी – ज्ञानसिंधू ह.भ.प. श्री विश्वनाथजी महाराज कोल्हे (नाशिक)

▪ गुरुवार, २९ जानेवारी – युवाचार्य ह.भ.प. संतोषजी महाराज आढावणे (भोकरदन)

▪ शुक्रवार, ३० जानेवारी – रामायणाचार्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वरजी महाराज आळंदीकर

▪ शनिवार, ३१ जानेवारी – आंतरराष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री विनोदजी कृष्ण शास्त्री महाराज (छत्रपती संभाजीनगर)

▪ रविवार, १ फेब्रुवारी – वारकरीरत्न ह.भ.प. श्री उद्धवजी महाराज चोले (खडकी)

सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. श्री महंत अनंतदासजी महाराज कजवाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. त्यानंतर सकाळी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसाद व भोजन व्यवस्था करण्यात आली असून, सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

याच सप्ताहात रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा व नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली असून, संपूर्ण धरणगाव नगरी हरिनामाच्या जयघोषाने भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

तसेच धरणगाव ते श्रीक्षेत्र मुक्ताई पायी दिंडी शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता निघणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

या भव्य अध्यात्मिक व सामाजिक सोहळ्याचे आयोजक श्री १००८ महामंडलेश्वर भगवानदाजी महाराज असून, पंचक्रोशीतील व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन, कथा, नामस्मरण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अखंड हरिनामाच्या या पावन पर्वातून भक्ती, सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक एकात्मतेचा दिव्य संगम अनुभवण्याची ही भाविकांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!