जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद
१४१० रुग्णांची नोंदणी; ५१० रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया

पाळधी (ता. धरणगाव) – पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच जि. प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवारातर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

सकाळी ७ वाजल्यापासून तालुक्यातील विविध गावांतून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी मोठी गर्दी केली. या शिबिरात एकूण १४१० रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी ५१० रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
शिबिरात सहभागी रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे रुग्णांकडून कोणताही मोबदला न घेता सर्व सेवा पूर्णतः मोफत देण्यात आल्या. या दृष्टीदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून लाभार्थी रुग्णांनी आयोजक व नेत्यांचे मनापासून आभार मानले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शंकरा हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम, पाळधी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. ऋषिकेश झंवर तसेच जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजोपयोगी उपक्रमातून गरजू नागरिकांना दृष्टीदान घडवून आणणारे हे शिबिर आदर्श ठरत आहे.



