जैन समाजासाठी आनंदाची बातमी: जबलपूर-रायपूर एक्सप्रेस आता ‘मुकमाटी एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणार!

धरणगाव (प्रतिनिधी): भारतीय रेल्वे मंत्रालयाने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली असून, जैन समाजाची दीर्घकाळापासूनची मागणी मान्य केली आहे. जबलपूर ते रायपूर दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्र. ११७०१/०२ (जबलपूर-रायपूर एक्सप्रेस) चे नामकरण आता ‘मुकमाटी एक्सप्रेस’ असे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशातील जैन समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आचार्य श्रींच्या स्मृतींना अभिवादन
परम पूज्य आचार्य श्री १०५ विद्यासागर महाराज यांची ‘तपोस्थली’ (जबलपूर) ते ‘समाधीस्थली’ (डोंगरगड/रायपूर क्षेत्र) यांना जोडणाऱ्या या रेल्वेला हे नाव देण्यात आले आहे. परम पूज्य आर्यायिका श्री १०५ पूर्णमती माताजी यांच्या मंगल प्रेरणा आणि मार्गदर्शनाने या नामकरणाचा पाठपुरावा करण्यात आला होता. ‘मुकमाटी’ हे आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे अजरामर महाकाव्य असून, रेल्वेला हे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

शासनाचे मानले आभार
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जैन समाजाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार नवीन जैन यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
प्रतिक जैन (झेडआरयूसीसी मेंबर, पश्चिम रेल्वे) यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, “हा निर्णय जैन समाजाच्या श्रद्धेचा सन्मान करणारा आहे. यामागे अनेक मान्यवरांचे प्रयत्न आणि आर्यायिका माताजींचे आशीर्वाद आहेत.”
ठळक बाबी:
- ट्रेन क्रमांक: ११७०१/०२
- जुने नाव: जबलपूर-रायपूर एक्सप्रेस
- नवीन नाव: मुकमाटी एक्सप्रेस
- महत्व: आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या तपोस्थली व समाधीस्थलीला जोडणारा मार्ग.
प्रतिक जैन – उपाध्यक्ष, श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, धरणगाव (जि. जळगाव)
सदस्य – झेडआरयूसीसी (ZRUCC), पश्चिम रेल्वे, मुंबई.



