
ढाका | बांगलादेश अल्पसंख्याक हिंदू समाजावरील वाढत्या हिंसाचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री (३१ डिसेंबर) जमावाकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला हिंदू तरुण खोकन चंद्र दास यांचा आज (३ जानेवारी) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते.
ढाका येथील नॅशनल बर्न अँड प्लास्टिक सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू असताना सकाळी ७:२० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ आणि दृश्य पुरावा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो खालील लिंकवर उपलब्ध आहे.(X लिंक) :👇 https://x.com/i/status/2007368598994792590
औषध दुकानातून घरी जाताना हल्ला
खोकन चंद्र दास हे बांगलादेशातील शरियतपूर जिल्ह्यातील दामुद्या उपजिल्हा येथील कोनेश्वर युनियनमधील क्युरभांगा बाजारात औषधांचे दुकान चालवत होते. ३१ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९:३० वाजता दुकान बंद करून रिक्षाने घरी परतत असताना काही हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम धारदार शस्त्रांनी खोकन दास यांच्यावर वार केले. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अचानक झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
जीव वाचवण्यासाठी तलावात उडी
आग लागल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खोकन दास यांनी जवळच असलेल्या तलावात उडी घेतली. त्यांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिक जवळ येताच हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या खोकन दास यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
३० टक्के भाजले होते शरीर
ढाका येथील नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डॉ. शाओन बिन रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार,
“खोकन दास यांच्या शरीराचा सुमारे ३० टक्के भाग भाजला होता. चेहरा आणि श्वसननलिकेला गंभीर इजा झाली होती. तसेच पोटावर धारदार शस्त्राने केलेले खोल वार होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.”
तीन दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी
घटनेनंतर खोकन दास यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर भाजल्यामुळे आणि अंतर्गत जखमांमुळे अखेर तीन दिवसांनंतर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
पोलिस तपास; दोन संशयितांची ओळख
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी रब्बी आणि सोहाग नावाच्या दोन स्थानिक संशयितांची ओळख पटवली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक शोधमोहीम राबवत असून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे. लवकरच दोषींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
खोकन दास यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
पत्नी सीमा दास म्हणाल्या,
“माझे पती अतिशय शांत स्वभावाचे होते. कोणाशीही त्यांचे वैर नव्हते. त्यांनी कुणाचेही वाईट केले नव्हते. तरीही त्यांच्यावर इतका अमानुष हल्ला का झाला, हे आम्हाला कळत नाही.”
पुतणे शांतो दास यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हिंदू समाजावरील हल्ले चिंताजनक
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यात मयमनसिंह येथे दिपू चंद्र दास या तरुणाची ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने हत्या केली होती, तर राजबारी येथे अमृत मंडल या तरुणालाही जीव गमवावा लागला होता.
या सततच्या घटनांमुळे भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून बांगलादेश सरकारने अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.


