‘एस.टी. डेपो नियंत्रण कक्षांच्या निष्क्रिय संपर्क क्रमांकामुळे प्रवासी त्रास्त !
प्रवाशांच्या सुविधेसाठी एस.टी. डेपोतील संपर्क व्यवस्था तातडीने कार्यरत करा – सुराज्य अभियानची मागणी


जळगांव – प्रवाशांच्या मूलभूत सुविधांसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी सुराज्य अभियान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) जळगांव विभाग नियंत्रक श्री दिलीप बंजारा साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.
एस.टी. प्रवाशांना बसची वेळ, विलंब, रद्दीकरण अथवा पुढील गाडीची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक डेपो व नियंत्रण कक्षामध्ये अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले असतात. मात्र, जळगांव एस.टी. डेपो व नियंत्रण कक्षातील अधिकृत संपर्क क्रमांक अनेकदा अकार्यक्षम असल्याचे आढळून येत आहे. अनेक वेळा “Out of Order” संदेश मिळतो किंवा कॉलला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. या तुटलेल्या व निष्क्रिय संपर्क व्यवस्थेमुळे प्रवाशांना कोणताही विश्वासार्ह माहितीस्त्रोत उपलब्ध राहत नाही. याचा गंभीर परिणाम ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार तसेच आपत्कालीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होत असून, ही बाब एस.टी. महामंडळाच्या सेवा-विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी व सार्वजनिक हिताला बाधा आणणारी आहे.
सुराज्य अभियानने ही गंभीर समस्या जळगांव विभाग नियंत्रक यांच्यासमोर ठोसपणे मांडली. यावेळी सुराज्य अभियानचे श्री. दुर्गाप्रसाद पाटील, श्री. राहुल घुगे, श्री. मेघराज पाटील, श्री. हिमांशू पाटील , श्री. आकाश सोनवणे, उपस्थित होते.
सुराज्य अभियानच्या प्रमुख मागण्या :
सर्व डेपोतील अधिकृत लँडलाइन क्रमांक तातडीने दुरुस्त करून ते २४ तास कार्यरत ठेवावेत.
प्रत्येक डेपो व नियंत्रण कक्षासाठी एक स्थिर लँडलाइन व एक अधिकृत मोबाईल क्रमांक (बॅकअप) नियुक्त करावा.
सर्व कार्यरत संपर्क क्रमांकांची सत्यापित व अद्ययावत यादी MSRTC च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
ही यादी डेपोतील सूचना फलकावर स्पष्टपणे दिसेल अशा स्वरूपात प्रदर्शित करावी.
निष्क्रिय क्रमांक किंवा कॉलला प्रतिसाद न देणे ही सेवा-त्रुटी मानून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी.
संपर्क प्रणालीची गुणवत्ता राखण्यासाठी तिमाही पडताळणी (Quarterly Verification) सक्तीची करावी.
जिल्हानिहाय २४x७ आपत्कालीन हेल्पलाइन कार्यक्षम ठेवून तिची माहिती व्यापकपणे प्रसिद्ध करावी.
नियंत्रण कक्षातील सेवा-गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग व मॉनिटरिंग प्रणाली लागू करावी.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता व प्रवाशी-हिताचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. वरील मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास, जळगांव जिल्ह्यात एस.टी. डेपो नियंत्रण प्रणालीच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा सुराज्य अभियानने दिला आहे.
हे निवेदन दिल्या नंतर श्री दिलीप बंजारा साहेबांनी कॉन्फरन्स कॉल वर तात्काळ सर्व डेपोंना या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले.




