“शेतकऱ्यांच्या कष्टकरी सोबत्याला वंदन; राज्यभरात बैलपोळा सण उत्साहात”

प्रतिनिधी- रवींद्र निकम
श्रावण महिन्यातील सण उत्सवांच्या परंपरेत शेतकरी बांधवांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण म्हणून ओळखला जाणारा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शेतकऱ्यांचा खरा सोबती आणि कष्टकरी बैल याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून, महाराष्ट्रातील गावागावांत सणाची रंगत दिसून आली.
या दिवशी शेतकरी सकाळी लवकर उठून बैलांच्या गळ्यातील दोर काढून त्यांना नदी अथवा तलावावर नेऊन आंघोळ घालतात. त्यानंतर बैलांना रंगीबेरंगी झुल, सजावट व शिंगांना रंग लावून आकर्षक रूप दिले जाते. विशेष म्हणजे बैलांना पुरणपोळी, बाजरीची खिचडी यांसारखे पदार्थ खाऊ घालून त्यांचे पूजन केले जाते.
सायंकाळच्या वेळी गावागावांत शेतकरी आपल्या बैलांसह चौकात एकत्र येतात. महिलावर्ग बैलांची आरती ओवाळून पूजा करतो. ढोल-ताशांच्या गजरात सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते. दिवसभर बैल व शेतकऱ्यांना विश्रांती दिली जाते, अशीही प्रथा आहे.
भारतीय संस्कृतीत मनुष्याबरोबरच प्राणीमात्रांच्याही पूजनाची परंपरा आहे. याच अनुषंगाने पुराणकथेतही बैलपोळ्याचे महत्व सांगितले गेले आहे. कथेनुसार भगवान शंकर व पार्वतीमाता यांच्यातील खेळाच्या वेळी नंदिने चुकीची साक्ष दिल्याने त्याला पृथ्वीवर जू बसण्याचा शाप मिळाला. परंतु नंतर पार्वतीमातेनं दिलेल्या वरदानामुळे वर्षातून एक दिवस बैलांची पूजा केली जाते, अशी श्रद्धा आजही टिकून आहे.
बैलपोळा हा केवळ एक सण नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीला खरा हातभार लावणाऱ्या बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याने ग्रामीण भागात आजही हा सण तेवढ्याच भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा केला जातो.




