धर्ममहाराष्ट्र
Trending

जळगाव येथे सहस्रावधी हिंदूंचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष !

हिंदु राष्ट्र-जागृती सभा

जळगाव, १ फेब्रुवारी (वार्ता.) – मस्तकावर टिळा, हातात भगवा आणि मुखाने ‘जय श्रीराम’ चा घोष करत जळगावमध्ये सहस्रावधी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष केला. वक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांचे मावळे होण्याचे आवाहन केले आणि उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी धर्मकार्यात योगदान देण्याची प्रतिज्ञा करत त्याला प्रतिसाद दिला. संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि विविध संघटनांचे धर्माभिमानी हिंदू, हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधी आणि समस्त हिंदू धर्मप्रेमी यांच्या सहभागाने मानराज पार्क येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानात १ फेब्रुवारी या दिवशी ही हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समिती आयोजित या सभेत पद, पक्ष, संघटना भेदून १५ सहस्रहून हिंदूंनी हिंदुत्वाचा हुंकार केला.

महामंडलेश्वर जनार्दनगिरी महाराज, सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती, तसेच (Retired)लेफ्टनंट कर्नल श्री. मनोज सिन्हा, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांची प्रमुख उपस्थिती व्यासपिठावर लाभली. शंखनाद आणि त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलनाने सभेला प्रारंभ झाला.  

सभेच्या प्रारंभी श्री. विनोद मासरे यांनी शंखनाद केला. श्री गणेश आणि ग्रामदेवता प्रभु श्रीराम यांना वंदन आणि त्यानंतर दीपप्रज्वलनानंतर झाले. ‘प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस…’ या सर्वगुणसंपन्न उपाधीचा जयजयकार करत मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती सर्वश्री श्रीराम जोशी, महेंद्र जोशी आणि पराग जोशी या ब्रह्मवृदांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर वेदमूर्ती आणि वक्ते यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन !

      पुणे येथील शिवाई संस्थेच्या वतीने जळगाव येथील मनराज पार्क मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या ठिकाणी शिवकालीन विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन १ फेब्रुवारी या दिवशी जळगावचे भाजपचे आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या हस्ते झाले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरू नंदकुमार जाधव, भाजपचे नगरसेवक सर्वश्री सुनील खडके, डॉ. वीरन खडके, मुकुंदा सोनवणे, प्रवीण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते श्री. नीलेश तायडे यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

क्षणचित्रे !

1. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या ज्वाज्वल्य विचारांची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

2. शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.

3. (Retired) लेफ्टनंट कर्नल श्री. मनोज कुमार सिंहा यांच्या शौर्याची गाथा दाखवणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

‘हिंदु राष्ट्र’ हाच भारताचा मूळ स्वभाव ! – सद्गुरु स्वाती खाडये  

                हिंदु राष्ट्र ही नवीन संकल्पना नाही, तर भारताचा मूळ स्वभाव आहे. त्रेतायुगातील रामराज्य, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेले धर्मराज्य, कृष्णदेवरायांनी स्थापलेले विजयनगरचे साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ही सर्व सनातन राष्ट्राची रूपे आहेत. लिखित राज्यघटना नव्हती, तेव्हा धर्माचे नियम हीच राज्यघटना होती. सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. त्यामुळे रामराज्याची पहाट कुणीही रोखू शकत नाही. रामराज्याच्या स्थापनेत वानरसेनेने महत्त्वाची भूमिका निभावली, त्याप्रमाणे स्वत:च्या कौशल्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कौशल्यासह तन-मन-धर्म समर्पित करणे ही काळानुसार साधना आहे.

… तर हिंदूंनी दबावनीती अंगीकारणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

           हिंदूंच्या आस्था पायदळी तुडवल्या जात असतील, हिंदू हिताचे कायदे होण्यास विलंब लागत असेल आणि हिंदूंवरील आघात रोखण्यास शासन-प्रशासन दिरंगाई करत असेल तर हे रोखण्यासाठी हिंदूंनी दबावनीति अंगीकारणे आवश्यक आहे. अन्य कुणी आपले अश्रू पुसेल या भ्रमात अधिक काळ हिंदू समाजाने राहू नये.हिंदूनी केवळ जागृत आणि संघटित होऊन भागणार नाही, तर सर्व प्रकारच्या जिहादचा बीमोड करण्यासाठी सक्षम आणि कृतीशील होणे आवश्यक आहे.  

धर्मशिक्षणपर ग्रंथांचे प्रकाशन !

सनातन संस्थेचा ‘किशोरावस्था एवं वैवाहिक जीवनसंबंधी संस्कार’ या नूतन हिंदी भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सनातन संस्थेच्या ‘दत्त’ या ग्रंथाच्या ऑनलाईन आवृत्तीचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.

अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम ! – ले. कर्नल मनोज सिंहा (निवृत्त)

      पितामह भीष्म आयुष्यभर आदर्श जीवन जगले; परंतु कौरवसभेत त्यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे ते कौरवाप्रमाणेच पापाचे भागिदार झाले. या उलट जटायू पक्षी असूनही जीवनाच्या शेवटी त्यांनी अधर्म करणार्‍या रावणाचा प्रतिकार केला. त्यामुळे जटायूला प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाच्या मिठीत मृत्यू आला. आयुष्य कितीही पुण्यकर्म केले; परंतु अधर्माचा प्रतिकार केला नाही, तर पुण्याचा क्षय होतो. अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम आहे. भगवान श्रीकृष्णागे भगवद्गीतेत हेच मार्गदर्शन अर्जुनाला केले होते आणि कलियुगातही भगवंताचे हेच मार्गदर्शन हिंदूंसाठी मार्गदर्शक आहे.

हिंदू माता-भगिनींनो धर्मासाठी लढा देणार्‍या बांधवांसाठी प्रार्थना करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

      छत्रपती शिवाजी महाराज हे अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी गेले तेव्हा त्यांची पत्नी सईबाई आजारी होत्या; परंतु त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना थांबवले नाही. आधी हिंदवी स्वराज हाच सईबाई यांचा विचार होता. आजही आपणाला सईबाई, माता जिजाऊ यांच्या सारख्या माता-भगिनी यांची आवश्यकता आहे. पतीच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करता तशी हिंदु धर्मासाठी लढा देणार्‍यांसाठीही ईश्वराकडे नियमित प्रार्थना करा. मनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा विचार धगधगत ठेवा; कारण हिंदु राष्ट्र असेच मिळणार नाही. त्यासाठी बलिदान द्यावे लागेल. हिंदु राष्ट्रासाठी अद्याप आपणाला अजून मोठा लढा द्यायचा आहे. 

श्री. विनोद शिंदे यांनी या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंसाठी वीरक्षी निर्माण करणारे स्वसंरक्षण प्रशिक्षण सादर करण्यात आले. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने या सभेची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!