सावदेत ४८ लाखांचा गुटखा जप्त; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

- सावदे (ता. धरणगाव):
सावदे गावाच्या शिवारात पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जळगाव यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ४८ लाख २२ हजार २६४ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे एमएच १९ सी वाय ६९७२ क्रमांकाच्या कंटेनर ट्रकमधून गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पाळधी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सावदे गावच्या शिवारात ट्रक ताब्यात घेतला.
कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव शरद मधुकर पवार यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. तपासात ट्रकमधून १२८ गोण्या प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
जप्त मुद्देमालामध्ये –
गुटखा : ₹४८,२२,२६४
कंटेनर ट्रक : ₹२५,००,०००
असा एकूण ₹७३,२२,२६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रदीप भाटू पाटील (वय ४९, रा. टहाकली, ता. धरणगाव) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पाळधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे, पीएसआय दत्तात्रय बडगुजर, एएसआय राजाराम सुरवाडे, पोलीस हवालदार योगेश सोनवणे, वसंत निकम, संदीप खंडारे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, मोहन पाटील, रमेश सूर्यवंशी, भारत पाटील यांच्या पथकाने केली.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, रवी कापडणे यांनीही या संयुक्त कारवाईत सहभाग घेतला.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करीवर मोठा आघात बसला असून पुढील तपास सुरू आहे.




