महाराष्ट्र

शेलू व सेंदूर्शनी परिसरात वाघाची दहशत; दोन शेळ्यांचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट

यवतमाळ (प्रतिनिधी): आर्णी तालुक्यातील शेलू आणि सेंदूर्शनी गावाशेजारील शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा आणि रात्रीही वाघ प्रत्यक्ष दिसून येत असल्याने शेतकरी आपल्या शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

दोन शेळ्यांचा वाघाने केला शिकार

​मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शेलू येथील शेतकरी अजय नामदेव पवार यांच्या दोन शेळ्यांवर वाघाने हल्ला करून त्यांना फस्त केले. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, जनावरांच्या शिकारीमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकरी आणि मजुरांची सुरक्षा धोक्यात

​सध्या शेतीकामाचे दिवस असताना, वाघाच्या भीतीमुळे मजूर शेतात येण्यास तयार नाहीत. “गावशिवारातच वाघाचे दर्शन होत असल्याने जीविताचा धोका निर्माण झाला आहे,” अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

“शेलू व सेंदूर्शनी परिसरात वाघाचा वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी निर्भयपणे शेतात जाऊ शकतील.”

पवन पवार, सामाजिक कार्यकर्ते

 

​या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पवन पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

वृत्त संकलन:

सूरज सुधाकरराव पवार

प्रतिनिधी, सनातन सारथी न्यूज, यवतमाळ.

संपर्क: ७३५०२३६१२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!