गवसले हरवलेल्या आठवणींचे धन : शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलमध्ये धरणगाव तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.

धरणगाव (प्रतिनिधी):
शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलमध्ये धरणगाव तालुका विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. निवृत्तीनंतरही विज्ञानाची ओढ कायम असलेले माजी मुख्याध्यापक प्रा. बी. एन. चौधरी यांनी प्रदर्शनाला उपस्थित राहून चिमुकल्या वैज्ञानिकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास, जिज्ञासा आणि आनंद पाहून जगण्याची नवी उमेद मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्रा. जगन्नाथ दरिंदले व जीपीएस संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे होते. कार्यक्रमाची सुरुवात जी. पी. चौधरी व विद्यार्थिनींच्या स्वागतगीत व विज्ञान गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व कल्पक विज्ञान उपक्रमाने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. भावना भोळे यांनी केले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणिवा समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करताना, परिश्रमातूनच संधीचे सोने करता येते, असा संदेश दिला. या प्रदर्शनात तालुक्यातील माध्यमिक गटातील ४५ व प्राथमिक गटातील १५ विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. शिक्षकांच्या शैक्षणिक साधनांच्या गटात ६ तर प्रयोगशाळा परिचर गटातून ३ उपकरणे मांडण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रदर्शनाचे संयोजक व विज्ञान समन्वयक एन. आर. सपकाळे यांचा डॉ. अनिल झोपे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. राजेंद्र सैदाणे, इंदिरा विद्यालयाचे सचिव सी. के. पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जे. के. पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, डी. एस. पाटील, पर्यवेक्षक ए. एस. पाटील, डी. एच. कोळी, पत्रकार बी. आर. माळी, भगीरथ माळी तसेच अनेक शिक्षक, केंद्रप्रमुख व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यल्प कालावधीत देखणे आयोजन केल्याबद्दल आयोजक शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बी. डी. शिरसाठ यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, आनंद व आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे चित्र दिसून आले.




