10 वी, व 12 वी, बोर्ड परीक्षेत वर्गखोल्यांमध्ये CCTV लावणे बंधनकारक — बोर्ड सहसचिव एम. व्ही. कदम

जळगाव, दि. 8 नोव्हेंबर (प्रतिनिधी):
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे आज नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने मुख्याध्यापक व प्राचार्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस नाशिक विभागीय मंडळाचे सहसचिव श्री. एम. व्ही. कदम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, प्राचार्य डॉ. विजय पाटील, तसेच ज्युनिअर कॉलेज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीची प्रस्तावना ज्युनिअर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. शैलेश राणे (उपप्राचार्य, सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रावेर) यांनी केली. मान्यवरांचा सत्कार गोदावरी फाउंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन करण्यात आला.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी शाळा व परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा — स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, प्रशस्त वर्गखोल्या व शिस्तबद्ध वातावरण — असणे आवश्यक असल्याचे सांगितले. “परीक्षा कॉपीमुक्त आणि शिस्तबद्ध पार पडल्या पाहिजेत,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
यानंतर सहसचिव श्री. एम. व्ही. कदम यांनी राज्यातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक रितीने पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की,
“राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांमध्ये वर्गखोल्यांमध्ये CCTV कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील. हे कॅमेरे केंद्रप्रमुख किंवा शाळा प्रमुखांच्या कार्यालयाशी जोडलेले असावेत.”
तसेच त्यांनी सांगितले की, वर्गखोल्यांमध्ये फॅन, स्वच्छता, सुरक्षित कंपाउंड व परीक्षार्थ्यांसाठी प्रसन्न वातावरण असणे आवश्यक आहे. “शासन कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवणार आहे. परीक्षार्थ्यांची हॉलमध्ये प्रवेशापूर्वी तपासणी करण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी सौ. रागिणी चव्हाण यांनी मानले.




