निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी राकेश मारिया यांची चौकशी करा !
150 हुन अधिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर

नंदुरबार येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनेची गृहखात्याकडे मागणी.
नंदुरबार (प्रतिनिधी):– राकेश मारिया या निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गुन्हेगारी कृत्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विशेष तपास पथक नेमण्याची मागणीचे निवेदन आज समस्त हिंदुत्ववादी संघटना नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी हिंदुत्ववादी श्री. मयूर चौधरी, श्री. सुमित परदेशी, जयेश भोई,भूषण पाटील, चेतन गवळी, कु.अश्लेषा पवार, भावना कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल मराठे हे उपस्थित होते. यावेळी 150 हून अधिक नागरिकांच्या सह्या निवेदनासोबत जोडण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या गृहखात्याची प्रतिमा देशभरात कलंकित करणारे अंटालिया स्फोटक प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. दोन्ही प्रकरणात “सुनील माने” आरोपी आहेत. त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. अलीकडेच मालेगाव विस्फोट प्रकरणातील निकालपत्रात न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकावर ताशेरे ओढले हे सर्वज्ञात आहे. या प्रकरणातही सुनील माने तपासकार्यात सहभागी होते. २००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट खटल्यात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली त्यातील आरोपींनीही सुनील मानेवर अमानुष छळ केल्याचे आरोप केले होते. राकेश मारिया या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे निकटवर्तीय म्हणून सुनील माने ओळखले जात. राकेश मारिया कित्येक वर्षे दहशतवाद विरोधी पथकात होते. दाभोलकर खून खटल्यात सर्वात प्रथम अटक झालेल्या “मनीष नागोरी” आणि “विकास खंडेलवाल” या आरोपींनी राकेश मारिया यांनी खोटा जबाब शपथेवर देण्याबद्दल २५ लाख रुपये देऊ केल्याचा आरोप केला होता. या आरोपीकडचे पिस्तूल दाभोलकरांच्या शरीरातील गोळ्यांशी जुळते असा बनावट फॉरेन्सिक अहवाल मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने प्राप्त केल्याचा निष्कर्ष केंद्रीय अन्वेषण विभागाने काढला ही बाब अलीकडेच सामोरी आली आहे.
या प्रकरणात सुनील माने बेकायदा तपासात सहभागी होते आणि निरपराध्यांना अडकविण्याचा प्रयत्न करीत होते असा पुरावाही न्यायालयापुढे आला आहे.
नाशिक येथे एका कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे पिस्तूल सापडल्याचा दावा २००९ साली राकेश मारिया आणि सुनील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या पत्रकार परिषदेला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पुढे नाशिक पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले त्यात राकेश मारिया आणि सुनील माने यांचा उल्लेखच नाही. त्यामुळे निरपराध व्यक्तीला बेकायदा ताब्यात घेऊन त्याच्याकडे पिस्तूल काढून दाखविल्याची किमया राकेश मारिया यांनी केल्याचे सरळ सरळ स्पष्ट झाले आहे. दाभोलकर खून आणि नाशिक पिस्तूल जप्ती प्रकरणात राकेश मारिया आणि सुनील माने संगनमताने गुन्ह्यात सहभागी होते. मालेगाव बॉम्बस्फोट आणि ट्रेन ब्लास्ट प्रकरणात या दोहोंची निंद्रद्य भूमिकाही न्यायालयात उघडकीस आली आहे. त्यामुळे अंटालिया स्फोटक प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोहोंमध्ये राकेश मारिया यांचा अदृश्य हात आहे का ?, याचा तपास होणे आवश्यक आहे.
राकेश मारिया अनेक राजकीय उच्चपदस्थांशी घसट ठेवून असल्याने ते सहीसलामत सुटत आले आहेत, हे स्पष्ट दिसून येते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहखात्याची प्रतिमा धुळीला मिळत आहे. 
वरील सर्व प्रकरणात राकेश मारिया आणि सुनील माने यांनी संगनमताने केलेल्या दुष्कृत्यांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (S. I.T.) स्थापन करण्याची मागणी आम्ही सर्व नागरिक आपणाकडे या निवेदनाद्वारे करीत आहोत.



