मुकुंदराव पणशिकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्राचे मा.ना.श्री. मंगलप्रभातजी लोढा यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न.

दि. 25 ऑक्टोबर 2025, हेडगेवारनगर गाव,ता.धरणगाव, जि. जळगाव
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित मुकुंदराव पणशिकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्र चे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. ना. श्री. मंगलप्रभातजी लोढा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख रा. स्व. संघ, मा. श्री शरदरावजी ढोले होते. तसेच सुप्रसिद्ध उद्योजक मा. श्री पुखराजजी पगारिया, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मा. श्री अनिल माळी साहेब, संस्था- अध्यक्ष मा. श्री भाईदासजी सोनवणे, संचालक मा. श्री चेतनजी कोठारी हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रतिक जैन समन्वयक, मुकुंदराव पणशिकर कौशल्य विकास केंद्र यांनी केले, तर प्रास्ताविक व प्रमुख मान्यवरांचा परिचय संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री. वाय. पी. पाटील यांनी केले.
केंद्र स्थापनेमागील उद्देश व ध्येय
या केंद्राची स्थापना समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. “ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास यांची सांगड घालून समाज परिवर्तन घडविणे” हे केंद्राचे प्रमुख ध्येय आहे.

या केंद्रामार्फत युवक-युवतींना विविध व्यवसायिक, संगणक, उद्योजकता आणि स्वावलंबन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणांद्वारे युवक स्वतःसाठी रोजगार निर्माण करतील तसेच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम होतील. समाजात आर्थिक सक्षमीकरण, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा विकास घडविणे हे केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मुकुंदराव पणशिकर यांच्या प्रेरणेने स्थापन केंद्र
या केंद्रास “मुकुंदराव पणशिकर” यांचे नाव देण्यात आले असून, त्यामागे त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा गौरव दडलेला आहे. मुकुंदरावजींनी संघाच्या विस्तारात, सामाजिक समरसता प्रस्थापित करण्यात आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावली. ते अनेक वर्षे प्रचारक, विभाग प्रचारक, प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रसारक म्हणून कार्यरत राहिले आणि धरणगाव परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली.
स्मारकाची पार्श्वभूमी
या केंद्राच्या स्थापनेमागील संकल्पना व प्रेरणा अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख मा. श्री शरदरावजी ढोले यांच्या मार्गदर्शनातून साकारली आहे. स्मारकाची जागा निश्चित करणे, भूमिपूजन, आणि उद्घाटनापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात त्यांचे मार्गदर्शन लाभले. याच स्मारकाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते यापूर्वी संपन्न झाला होता.
मा. श्री अनिल माळी, अतिरिक्त आयुक्त (MSSDS) यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेस आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले.
सुप्रसिद्ध उद्योजक मा. श्री पुखराजजी पगारिया यांनी धरणगाव शहराविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, युवकांनी रोजगाराच्या शोधात न राहता व्यवसाय आणि उद्योजकतेची वाट स्वीकारावी, असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी आपले जन्मगाव हिंगोणे (ता. धरणगाव) येथील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या ग्रामीण बोलीभाषेत प्रेमळ संवाद साधत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या साध्या, आत्मीय भाषणाने सभागृहात उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
मंत्री मा. ना. मंगलप्रभातजी लोढा यांनी महाराष्ट्र राज्यातील रोजगार आणि उद्योजकतेसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात उद्योगांना चालना मिळावी, स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न त्यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख, रा. स्व. संघ मा. श्री शरदरावजी ढोले यांनी मुकुंदराव पणशिकर यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या जीवनातून समाजासाठी घेण्यासारख्या प्रेरणा अधोरेखित केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. चेतन कोठारी यांनी मानले.




