
प्रस्तावना : भारत ही आध्यात्मिक भूमी आहे; मात्र गेल्या २-३ शतकांत परकीय आक्रमकांमुळे, तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष प्रयत्न न झाल्याने भारताचा हा वैभवशाली वारसा क्षीण झाला होता. तो बलवान करण्यासाठी आध्यात्मिक पुनरुत्थान होणे आवश्यक होते. इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून धर्म आणि अध्यात्म यांच्या प्रसाराचे, त्यांवर घेतल्या जाणार्या आक्षेपांचे खंडण करण्याचे, तसेच साधनेचे बळ असलेले तेजस्वी धर्मप्रचारक निर्माण करण्याचे दिव्य कार्य आरंभले. गुरुकृपेने अल्पावधीतच संस्थेच्या कार्याचा भारतभर विस्तार झाला आणि सनातनच्या साधकांनी गावोगावी, खेडोपाडी धर्म आणि संस्कृती यांचा जागर केला.
संस्थेची वाटचाल : सनातन संस्थेचे संस्थापक गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी २२ मार्च १९९९ या दिवशी सनातनचे बीज रोवले आणि अवघ्या २५ वर्षांत या बिजाचा वटवृक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळेच आज ‘सनातन संस्था ही हिंदु धर्माचा तेजस्वी प्रसार करणारी संस्था’ म्हणून विख्यात आहे. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता; कारण याच काळात संस्थेला ‘आतंकवादी संस्था’ ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न झाला. निरीश्वरवाद्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहस्रो साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. असा संघर्षाचा काळ अनुभवत संस्थेचा २५ हून अधिक वर्षांचा प्रवास झाला आहे. कठीण प्रसंगांतही सनातनने अध्यात्मप्रसाराचे, धर्मप्रसाराचे कार्य निष्ठेने आणि चिकाटीने चालू ठेवले. हे शक्य होऊ शकले ते गुरुदेवांनी दिलेल्या शिकवणीमुळे !

संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : गुरुदेव अर्थात् प.पू. डॉक्टर हे स्वतः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ होते. वर्ष १९७१ ते १९७८ या कालावधीत त्यांनी इंग्लंडमध्ये ‘क्लिनिकल हिप्नोथेरपी’ अर्थात् ‘वैद्यकीय संमोहनउपचार’ या विषयावर विस्तृत संशोधन केले. त्यांनी ‘इओसिनोफिलीया’ हा रक्तांच्या पेशींचा रोग मानसिक कारणांमुळे होतो, याचा शोध लावला. वर्ष १९७८ ते १९८५ या कालावधीत वैद्यकीय उपचार करतांना त्यांना हे दिसून आले की, जवळपास ३० टक्के रुग्ण त्यांच्या वैद्यकीय उपचारांनी बरे न होता साधना केल्यानंतर, त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबळी यांसारखे विधी केल्यानंतर बरे होतात. तेव्हा त्यांच्या मनामध्ये अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्या काळात त्यांनी अध्यात्मातील अधिकारी संतांकडून अध्यात्म आणि हिंदु धर्म यांचा अभ्यास केला अन् स्वतः प्रत्यक्ष साधनेला प्रारंभ केला. इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही अध्यात्मातील अधिकारी संत झाले. सनातन हिंदु धर्मातील हे अध्यात्म‘शास्त्र’ स्वरूपात म्हणजे ‘सायन्स’ म्हणून स्थापित व्हावे, यासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले, तसेच सनातन धर्माचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार करण्यासाठी सनातन संस्थेची स्थापना केली आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा नवीन साधनामार्ग साधकांना शिकवला.

३. गुरुकृपायोगानुसार साधना : गुरुदेव हे शास्त्रज्ञ असल्याने त्यांनी सनातन धर्मातील अध्यात्मशास्त्र आणि साधनापद्धत यांचेही संशोधनात्मक अध्ययन केले.
अ. या अध्ययनातून त्यांनी एक सिद्धांत प्रस्थापित केला, तो म्हणजे, ‘शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वांनी एकसमान साधना न करता ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येकाने स्वतःच्या प्रकृतीनुसार, म्हणजेच स्वभावानुसार साधना केली पाहिजे’, उदाहरणार्थ, ज्याच्या मनात भक्तीभाव आहे, त्याने ध्यानयोगानुसार किंवा ज्ञानयोगानुसार साधना करण्यापेक्षा भक्तीयोगानुसार साधना केली, तर त्याची लवकर उन्नती होऊ शकते.
आ. साधकाची आध्यात्मिक उन्नती शीघ्र व्हावी, यासाठी त्यांनी विविध तत्त्वे सांगितली, उदाहरणार्थ, एकाच वेळी अनेक देवतांची उपासना करण्यापेक्षा आपली श्रद्धा असलेल्या एका देवतेची किंवा गुरूंनी सांगितलेली साधना केल्यास त्या देवतेची अनुभूती घेणे सुलभ होते. त्यांनी ‘स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणे’, हे तत्त्व सांगितले; कारण देवता, अध्यात्म हे सर्व विषय सूक्ष्म जगताशी संबंधित आहेत. साधना करणार्याने स्थुलातून प्रयत्न करतांना सूक्ष्मातील देवतेचे सान्निध्य अनुभवणे महत्त्वाचे असते.
इ. त्यांनी काळानुसार साधना करण्याचे तत्त्व सांगितले आहे, उदा. प्रत्येक युगाची साधना जशी ठरलेली असते, तशी साधना करतांना ‘काळानुसार काय चालू आहे’, याचे भान ठेवून साधना करणे महत्त्वाचे असते. त्यांनी सांगितले की, धर्माला ग्लानी आलेली असतांना धर्मसंस्थापनेसाठी साधना करणे, हे सध्याच्या काळात आवश्यक आहे. यासाठीच सनातनचे साधक वैयक्तिक साधना म्हणून धर्मसंस्थापनेच्या म्हणजे हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या या कार्यात सहभागी झालेले आहेत.
ई. प.पू. डॉक्टरांनी कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगांचा संगम असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनापद्धतीची निर्मिती केली. याचा उद्देश हाच होता की, एकाच वेळी तिन्ही साधनापद्धतींनी साधना केली, तर साधकाची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होईल. गुरुकृपायोगानुसार साधना करून आतापर्यंत १३२ जण संतपदी आरूढ झाले आहेत, तर १ सहस्रांहून अधिक साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ही खरोखर आध्यात्मिक क्रांती आहे.

अध्यात्मप्रसार : आज प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. हा शाश्वत आनंद साधना केल्यामुळे मिळू शकतो. यासाठी सनातनकडून अनेक गावी साधनासत्संग, युवा साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग, तसेच जीवनात अध्यात्माचे महत्त्व शिकवणारी प्रवचने आयोजित केली जातात. या धर्मकार्यातून तेजस्वी आणि धर्मकार्यासाठी योगदान देणार्या समर्पित साधकांची फळी निर्माण होत आहे. अक्षरशः सहस्रो साधक आणि शेकडो कुटुंबे सनातनशी जोडली गेली आहेत. अनेक उच्चविद्याविभूषितांनी स्वेच्छेने नोकरी-व्यवसाय सोडून धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. सनातन संस्थेच्या सत्संगांमुळे सांगली जिल्ह्यातील एका गाव तंटामुक्त झाले आणि त्याला शासनाचा पुरस्कारही मिळाला. त्या गावातील २ गटांमध्ये भांडणे होती; पण सत्संगामुळे गावकर्यांच्या मनात परिवर्तन होऊन त्या २ गटांतील वैर संपले. एका जिल्ह्यातील एक व्यक्ती कौटुंबिक त्रासामुळे निराश होऊन जीवन संपवण्यासाठी चालली होती. त्यापूर्वी ती मंदिरात दर्शनासाठी गेली आणि तिथे थोड्या वेळ बसली. त्या मंदिरात सनातनचा सत्संग चालू होता. त्या थोड्या वेळात तिला सत्संगाचा जो काही लाभ झाला, त्यातून त्या व्यक्तीने जीवन संपवण्याचा विचार काढून टाकला. पुढे जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून नियमितपणे सत्संगाला येऊ लागली, तेव्हा तिने स्वतःच हा अनुभव सांगितली. अशी अक्षरशः सहस्रो उदाहरणे आहेत. साधनेमुळे येणार्या दिव्य अनुभूतींमुळेच सहस्रो जण संस्थेशी जोडले गेले आहेत.

स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया : हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये षड्रिपूंपासून दूर रहाण्याचे मार्गदर्शन आहे, तसेच चित्तशुद्धीचे महत्त्व सांगितले आहे. या दोन्ही गोष्टी साध्य करणारी प्रक्रिया म्हणजे ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ ! सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्मातील अधिकारी संत बनण्यापूर्वी जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ होते. त्यांनी स्वसंमोहनाद्वारे स्वभावदोष निर्मूलन करणार्या स्वयंसूचनेच्या पद्धती शोधल्या. ‘व्यक्तीमत्त्वातील दोष हे मनातील संस्कार असल्याने मनापेक्षा सूक्ष्म असलेल्या बुद्धीच्या उपयोगाद्वारे त्यांवर नियंत्रण मिळवता येते’, हा त्यांच्या शोधकार्याचा निष्कर्ष होता. ईश्वर दोषरहित आणि सर्वगुणसंपन्न असल्याने साधकाला आध्यात्मिक उन्नतीसाठी दोषांचे निर्मूलन अन् गुणांचे संवर्धन करावे लागते, तसेच अहंकारामुळे ‘मी ईश्वरापासून वेगळा आहे’, ही जाणीव दृढ होत असल्याने आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्या साधकाला ‘अहं निर्मूलन करणे’ आवश्यक असते. यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचा समावेश करण्यात आला.
सनातन संस्था समाजालाही निःशुल्क स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवते. सनातनच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी मानसिक तणाव निर्मूलन कार्यशाळा, तसेच व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा यांचेही निःशुल्क आयोजन केले जाते. या अंतर्गत ‘ज्या स्वभावदोषामुळे तणाव उत्पन्न होतो, त्या व्यक्तीमत्त्वाच्या दोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःच्या बुद्धीद्वारे मनाला स्वयंसूचना कशी द्यायची’, हे शिकवले जाते. याच पद्धतींचा अवलंब केल्याने केवळ जीवनातील तणावाचेच निर्मूलन होते, असे नाही, तर स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा आणि पर्यायाने नेतृत्वगुणाचा विकासही होतो. या प्रक्रियेमुळे सहस्रो जणांनी त्यांचा ताण दूर होऊन मन आनंदी झाल्याचे, जीवनाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचे अनुभवले आहे.

आध्यात्मिक ग्रंथसंपदा : सनातनच्या आध्यात्मिक कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अध्यात्माचे ज्ञान देणार्या, म्हणजेच सनातन धर्माचे शिक्षण देणार्या अमूल्य ग्रंथसंपदेची निर्मिती ! या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथांमध्ये आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सनातन धर्मातील अध्यात्माची शिकवण आहे. गेली अनेक दशके हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याने त्यांच्या मनात अध्यात्मविषयक आणि धर्मविषयक अनेक शंका आहेत. उदाहरणार्थ, गणपतीला लाल फूलच का वहायचे, शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा का घालत नाहीत, देवघरात देवतांची रचना कशी असते इत्यादी. सनातनच्या ग्रंथांमध्ये यांसारख्या प्रश्नांची शास्त्रीय परिभाषेत उत्तरे देण्यात आली आहेत. अध्यात्मातील ‘का’ आणि ‘कसे’ या प्रश्नांची उत्तरे देणारे हे ग्रंथ आहेत. त्या जोडीला अध्यात्ममार्गावर चालणार्यांसाठी साधना म्हणजे काय, साधनेत येणार्या अडथळ्यांवर मात कशी करायची, यांविषयीही मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ सनातनने प्रकाशित केले आहेत. थोडक्यात, आनंदी जीवनासाठी अध्यात्म, धर्म, हिंदु राष्ट्र, आचारधर्म, व्यक्तीमत्त्व विकास, आयुर्वेद आदी अनेक विषयांवर सनातनने ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ऑगस्ट २०२५ पर्यंत १३ भारतीय भाषांमध्ये ३६८ ग्रंथांच्या १ कोटींहून अधिक प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अजूनही ५ सहस्र ग्रंथ प्रकाशित होतील, एवढ्या लिखाणाचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संग्रह करून ठेवला आहे. एवढ्या ज्ञानाचा विशाल संग्रह आणि एखाद्या आध्यात्मिक संस्थेच्या ग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती मुद्रित होणे, ही गुरुकृपा आहे. या ग्रंथांमुळे अनेक हिंदूंच्या साधनेचा पाया भक्कम झाला. समाजाची आध्यात्मिक चेतना जागृत करण्यात या चैतन्यदायी ज्ञानपरंपरेचाही वाटा आहे. पुढील अनेक पिढ्यांना अध्यात्मातील विविध विषयांवरील ज्ञान मिळावे, या उदात्त हेतूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आज ८३ व्या वर्षीही अंथरूणावर खिळून असतांनाही ग्रंथलिखाणाचे कार्य अविरतपणे करत आहेत.

सनातन आश्रम : सनातन संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सनातन आश्रमांची निर्मिती ! समष्टी साधना म्हणून हिंदु धर्माचे पूर्णवेळ कार्य करण्याची इच्छा असलेल्या साधकांसाठी या आश्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. आज राजकारण्यांनी समाजाला जातीजातींत विभाजित केले आहे. या पार्श्वभूमीवर सनातनच्या आश्रमांतील जातीनिरपेक्षता ठळकपणे दिसणारी आहे. आश्रमातील प्रत्येक जण एकमेकांकडे ‘हा साधकबंधू आहे, गुरुबंधू आहे, धर्मबंधू आहे’, या आध्यात्मिक भावाने पहातो. त्यामुळे सनातन आश्रम हे शेकडो सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, हे या आश्रमांतून अनुभवता येते. आज सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची छोटीशी प्रतिकृतीच बनली आहे. गोव्यात आल्यावर पुरी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि कांची कामकोटी पिठाधीश्वर श्री स्वामी जयेंद्र सरस्वती हेही सनातन आश्रमात आले होते आणि त्यांनी सनातनच्या कार्याचा गौरव केला. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य आदि शंकराचार्यांसारखे आहे’, असे गौरवोद्गार शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी काढले होते, तर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांनीही ‘सनातनने २५ वर्षांत केवळ धर्माचा प्रसार केला नाही, तर अधर्माचा प्रतिकार करणारा समाज निर्माण केला’, या शब्दांत सनातनचे कौतुक केले. संतांचे हे बोल म्हणजे संस्थेच्या कार्याची पोचपावती आहे आणि पुढील कार्य करण्यासाठी दिलेला तो आशीर्वादच आहे, असे आम्ही मानतो. देशविदेशांतील अनेक संत, महंत, आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी, संशोधक, हिंदु धर्मासाठी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत धर्मनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ आदी सनातन आश्रमाला भेट देण्यास नित्य येत असतात.
आध्यात्मिक हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्य : आज सर्वत्र हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे; पण जेव्हा ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारणेही गुन्हा वाटावा, अशी स्थिती होती, तेव्हा म्हणजे वर्ष १९९८ मध्ये गुरुदेवांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित करून हिंदु राष्ट्राचा विचार मांडला. त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रित राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, अशी मांडणी केली होती. आज त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयीचे ५ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सनातन संस्थेद्वारे धर्मसभा, व्याखाने, दूरचित्रवाहिन्या आणि पत्रकार परिषदा यांद्वारे हिंदु राष्ट्राच्या समर्थनार्थ वैचारिक भूमिका प्रस्तुत केली जाते. त्या जोडीला हिंदु आणि राष्ट्र विरोधी नॅरेटिव्हज्चे वैचारिक खंडण करून राष्ट्र आणि धर्म हिताचे नॅरेटिव्ह स्थापित होण्यासाठीही संस्था कटिबद्ध आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाच्या माध्यमातूनही वैचारिक प्रदूषण दूर करण्याचे कार्य सनातन करत आहे.
यज्ञयाग : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सनातन संस्थेचा सहभाग मुख्यतः आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी सनातनच्या आश्रमात आतापर्यंत ४५० हून अधिक यज्ञयाग आणि धार्मिक विधी करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने साग्निचित् अश्वमेध महासोमयाग, उच्छिष्ट गणपति यज्ञ, चंडीयाग, धन्वंतरि याग, संजीवनी होम, पंचमहाभूते याग इत्यादी यज्ञांचा समावेश आहे. या यज्ञाचा संकल्प वैयक्तिक लाभाचा नव्हता, तर विश्वकल्याणाचा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचा होता.
सनातन संस्थेला मिळालेला पुरस्कार : सनातनच्या या दिव्य कार्याची दखल विदेशातही घेतली गेली. सनातन संस्थेने भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल जून २०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. खरे तर, उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले, तरी त्यांचा झालेला सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राविषयी केलेले अलौकिक संशोधनकार्य आणि ग्रंथलेखन, तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचाच आज एकप्रकारे गौरव झाला आहे, असे आम्ही मानतो.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त मे २०२५ मध्ये गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय महोत्सवात २३ देशांतील ३० हजारांहून अधिक साधक, १००० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, शेकडो साधू-संत, महंत सहभागी झाले होते. मीडियाच्या माध्यमातून १५ कोटींहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला. या महोत्सवामध्ये धर्म, देव, देश रक्षणार्थ विचारमंथन आणि दिशादर्शन झाले. आज ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’कडून सनातन मानबिंदूंवर, म्हणजे ‘गोमाता, गंगा, मंदिरे, देवता, धर्मग्रंथ’ आदींवर सातत्याने आघात होत आहेत. ‘सनातन धर्मातील ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ हे पुरुषार्थ; ‘ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम’ हे ४ आश्रम; जन्मापासून मृत्यूपर्यंतचे १६ संस्कार; एकत्रित कुटुंबव्यवस्था’ आदी सर्व नष्ट होत आहे किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सनातन धर्माची पताका ज्यांनी उंच उंच फडकवली पाहिजे, ती युवा पिढी व्यसने आणि ‘सोशल मीडिया’ यांमध्ये गुंतली आहे. त्यामुळे देशविरोधी आणि सनातनविरोधी शक्तींचे अजेंडे यशस्वी होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राचे सनातनत्व टिकवून ठेवणे आणि सनातन मानबिंदू, म्हणजे ‘गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ’ आदींना पुनर्वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. याच उद्देशासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सनातन धर्माची ध्वजा भारतात फडकवण्याचा दृढसंकल्प या महोत्सवात करण्यात आला.
आगामी योजना : ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ म्हणजे ‘संपूर्ण विश्व सुसंस्कृत करू’ ही आपल्या ऋषिमुनींची घोषणा आहे. सनातनही त्यासाठीच कार्यरत आहे. अध्यात्मप्रसार, साधनाविषयक मार्गदर्शन, तसेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी आगामी काळातही सनातन संस्था कटिबद्ध असेल. स्थापनेपासून आतापर्यंत संस्थेचे जे कार्य केले, ते गुरुकृपेनेच होऊ शकले आहे आणि भविष्यातही गुरुतत्त्व हे कार्य करवून घेईल. मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय आहे. ते साधनेद्वारेच साध्य होऊ शकते. त्यामुळे आनंदी जीवनासाठी, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आजच साधनेला आरंभ करा, जे साधनारत आहेत, त्यांनी साधना वाढवण्याचा प्रयत्न करा.
त्यासाठी भगवंताने सर्वांना शक्ती, भक्ती आणि बुद्धी द्यावी आणि भारतावर आलेले अधर्माचे मळभ दूर होऊन धर्मसूर्याचा उदय व्हावा अन् त्याच्या किरणांनी संपूर्ण विश्व तेजस्वी आणि चारित्र्यसंपन्न व्हावे, अशी श्रीमन्नारायणाच्या चरणी प्रार्थना !

संकलक : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था (स्थानिक संपर्क : 9284027180)



