लोकल न्यूज़
ढोल-ताशांच्या गजरात धरणगावात गणरायाला निरोप

प्रतिनिधी- रवींद्र निकम
धरणगाव (ता. 02 सप्टेंबर 2025) – शहरात मंगळवारी गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथकांच्या तालावर नाचणारे तरुण-तरुणी आणि भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने शहर दुमदुमून गेले.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी विविध गणेशोत्सव मंडळांनी व लेझीम पथकांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग नोंदवला. गणेश मूर्ती विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत भक्तिगीते, घोषणाबाजी आणि आकर्षक सजावट केलेले रथ यांनी उत्सवाला विशेष रंगत आणली.
संपूर्ण मिरवणूक शांततेत, भक्तीमय वातावरणात आणि पोलिस बंदोबस्ताखाली पार पडली. विसर्जनानंतर गणेशभक्तांनी “पुढच्या वर्षी लवकर या” अशा उत्कट शब्दांत बाप्पाला निरोप दिला.



