उत्तराखंड देवदर्शनासाठी गेलेले पाळधीचे १३ युवक सुखरूप; सोशल मीडियावर सेल्फी टाकत दिला सुखरूप असल्याचा संदेश
"सेल्फीच्या माध्यमातून दिला दिलासा: बेपत्ता युवक सुखरूप"

पाळधी (ता. धरणगाव) – उत्तराखंडमध्ये देवदर्शनासाठी गेलेले पाळधी (माळी वाडा) येथील १३ युवक, चालक व त्याचा सहकारी यांचा अखेर संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या युवकांनी आपला एकत्र सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या कुटुंबियांना व गावकऱ्यांना “आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत” असा दिलासा दिला.

ही बातमी समजताच गावात आणि त्यांच्या परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार दिवसापासून या तरुणांचा कोणताही संपर्क नसल्यामुळे चिंता निर्माण झाली होती. २७ जुलै रोजी हे सर्वजण टेम्पो ट्रॅव्हल (MH 19 CY 2202) ने उत्तराखंडच्या देवदर्शन यात्रेसाठी रवाना झाले होते. शेवटचा संपर्क ५ ऑगस्ट रोजी झाल्यानंतर त्यांच्या हालचालींबाबत कोणतीही माहिती नव्हती.
ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ यंत्रणांना सूचित करत दिल्लीत जाऊन केंद्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी उत्तरकाशी येथे प्रत्यक्ष जाऊन शोध मोहिमेला वेग दिला. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
अखेर या तरुणांनी उत्तराखंडमधून एकत्र सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकत आपण सर्वजण ठीक आहोत, कोणतीही काळजी करू नका, असा संदेश दिला. त्यांच्या या पोस्टनंतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे.
संपर्क झालेल्या युवकांची नावे –
1. रोहन दिनेश माळी
2. रोहित बंडू माळी
3. मनोज संजय चौधरी
4. ज्ञानेश्वर संजय माळी
5. दीपक रत्नाकर सोनार
6. संगदीप भारत ननवरे
7. दीपक माळी
8. वैभव गंगवने
9. संदीप माळी
10. अक्षय पाटील (सुरत)
11. रिंकेश खुशाल माळी
12. भूषण सुरेश माळी
13. पवन माळी
ही सर्व मंडळी उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. दुर्गम भागात नेटवर्कची अडचण असल्यामुळे संपर्कात अडथळे येत होते.



