खालीद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

धरणगाव (प्रतिनिधी):धरणगाव तहसील कार्यालयात हिंदू जनजागृती समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देऊन नुकत्याच प्रदर्शित होत असलेल्या ‘खालीद का शिवाजी’ या वादग्रस्त चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या द्वेषमूलक वक्तव्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की, ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला आहे. तसेच, चित्रपटात महाराजांच्या सैन्यात ३०% मुस्लिम सैनिक होते, मुस्लिम सैनिकांनसाठी रायगडावर मशिद बांधली गेली, त्यांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते इत्यादी खोट्या आणि अप्रामाणिक गोष्टींवर आधारित कथा मांडून इतिहासाचा विकृतीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ, सर्वधर्मसमभाव मानणारे होते आणि हिंदू राज्यकर्ते नव्हते असा खोटा प्रचार सुरू आहे, असा आरोप निवेदनकर्त्यांनी केला.
यावर संताप व्यक्त करत, समितीने विचारले की, जर महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते, तर मराठा आणि इतर जातींचे मावळे झोपले होते का? रायगडावरील मशिद कायदाबाह्य नसून ती जिहादी षड्यंत्राचा भाग आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
त्याचबरोबर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंक वाद नसेल तर “सनातन आतंकवाद” आणि “हिंदू आतंकवाद” आहे. असे उल्लेख करून समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले. मालेगांव बॉम्बस्फोट घडून आल्यानंतर तपासाची दिशा चुकवून अनेक निर्दोष हिंदू कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व त्यांच्या कार्यकाळात घडले. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समितीने केली.
या संदर्भात सरकारने:
‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटावर तातडीने बंदी आणावी
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा
राजकीय नेत्यांसाठी स्पष्ट आचारसंहिता तयार करावी
अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले..
या वेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे बजरंग दलाचे प्रथम राजपूत, प्रतिष्ठान चे प्रवीण पाटिल, यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




