धरणगावात श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन

धरणगाव (प्रतिनिधी) :
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित, धरणगाव यांच्या वतीने श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता श्रीमद् भागवत महा मिरवणुकीने सप्ताहाला सुरुवात होणार आहे. मिरवणूक श्री बालाजी महाराज मंदिरातून सुरू होऊन धरणी चौक, कोट बाजार, बालाजी पतसंस्था, परिहार चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, आंबेडकर महाराज स्मारक, बालकवी ठोंबरे मार्गे श्री स्वामी समर्थ केंद्रात येऊन महाआरतीने समारोप होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता महाआरती होईल.
1 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता सामुदायिक भागवत पारायण वाचन होईल. त्यानंतर दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत संगीतमय निरूपण व आरती आयोजित केली आहे.
सप्ताहाचा समारोप 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता निरूपणाने तर दुपारी 3 वाजता होणाऱ्या दहीहंडी कीर्तनाने होणार आहे.
या सप्ताहात ह. भ. प. श्री वाल्मिकजी महाराज सुराईकर (सद्गुरु जोग महाराज मठ, जुनी कोथळी, मुक्ताईनगर) यांचे अमृततुल्य वाणीतून भागवत निरूपण होणार आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित सेवेकरी परिवाराने पंचक्रोशीतील भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमद् भागवत पारायण व संगीतमय कथेचा लाभ घ्यावा.




